नवी दिल्ली - जगभरामध्ये कोरोनाचा प्रसार झाला असून रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, यात दिलासादायक बाब म्हणजे, कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेटही वाढला असून तो 93.67 टक्के आहे. तर मृत्यूदर 1.47 आहे. आज 46 हजार 232 नव्या रुग्णांची नोंद झाली असून एकूण कोरोना रुग्णांची आकडेवारी 90 लाख 50 हजार 598 वर पोहोचली आहे. तर नव्याने 564 जणांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत 1 लाख 32 हजार 726 जणांचा बळी गेला आहे. याचबरोबर सध्या 4 लाख 39 हजार 747 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
गेल्या 24 तासांमध्ये 49 हजार 715 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज दिला असून एकूण कोरोनामुक्त रुग्णांची संख्या 84 लाख 78 हजार 124 वर पोहचली आहे. तर गेल्या 24 तासांत 10 लाख 66 हजार 22 कोरोना चाचण्या झाल्या आहेत. तर आतापर्यंत तब्बल 13 कोटी 6 लाख 57 हजार 808 कोरोना चाचण्या पार पडल्या आहेत. तर राज्यनिहाय आकडेवारी पाहता महाराष्ट्रात सर्वांत जास्त कोरोनाचा प्रसार झाला आहे.
तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणी -
भारत बायोटेक या हैदराबादची फार्मा कंपनीकडून कोव्हॅक्सिनच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या रोहतक, हैदराबाद आणि गोवा येथे सुरू झाल्या आहेत. देशभरातील 20 रिसर्च सेंटरमध्ये 25 हजारपेक्षा जास्त स्वयंसेवकांना कोरोना प्रतिबंधक लसीचा डोस दिला जात आहे. 20 सेंटरपैकी एक सेंटर रोहतकमध्ये आहे. पहिल्या टप्प्यात 375 तर, दुसऱ्या टप्प्यात 380 स्वयंसेवकांना लस देण्यात आली आहे. आता तिसऱ्या टप्प्यामध्ये 25 हजारपेक्षा जास्त स्वयंसेवकांना लसीचा डोस देण्यात येत आहे.
कोव्हॅक्सिन लस -
कोव्हॅक्सिन ही कोरोनावरील लस हैदराबादमधील भारत बोयोटेक कंपनी, राष्ट्रीय विषाणू संस्था (एनआयव्ही) आणि आयसीएमआरच्या सहकार्याने तयार करण्यात आली आहे. भारत बायोटेककडून कोरोनावरील लसीचे देशात मोठ्या प्रमाणात उत्पादन घेण्यात येणार आहे. भारतामधून कोरोनावरील लसीचे उत्पादन कमी दरात होऊ शकते, असा जगभरातील अनेक देशांना विश्वास आहे. कोरोनासाठी जगभरात सध्या १४५हून अधिक लसींची निर्मिती करण्यात येत आहे. यापैकी केवळ २० लसींना मानवी चाचणी करण्याची परवानगी मिळाली आहे.