नवी दिल्ली - भारत-चीन सीमेवरील तणाव कमी करण्याबाबत रविवारी (दि. 2 ऑगस्टला) चीन आणि भारतीय लष्कराच्या कमांडर स्तरावरील बैठक झाली होती. या बैठकीत कोणताच मार्ग निघाला नाही. त्यामुळे आता मेजर जनरल स्तरावरील बैठकीत चर्चा करण्यात येणार आहे.
मेजर जनरल स्तरावरील बैठक ही दौलत बेग ओल्डी या ठिकाणी होणार आहे. यापूर्वी पूर्व लडाखमध्ये नियंत्रण रेषेजवळ निर्माण झालेल्या तणावातून मार्ग निघण्याची शक्यता धुसर झाली होती. एकूणच या सर्व परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारत-चीनला लागून असलेल्या सीमाभागांमध्ये आणखी 35 हजार जवान तैनात करण्याची तयारी करण्यात आली होती.
गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या जवानांमध्ये झालेल्या चकमकीदरम्यान 20 भारतीय जवानांना वीरगती प्राप्त झाली होती. तर भारतानेही प्रत्युत्तरात चीनच्या 40 जवानांचा खात्मा केला होता. यानंतर दोन्ही देशांमधील तणाव वाढला होता. त्यानंतर हा तणाव कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू होते. पण, चीनच्या आडमुठेपणामुळे तणाव कमी करण्यात अद्याप यश आले नाही.