नवी दिल्ली : भारत-चीन सीमा प्रश्नावरून काँग्रेस पक्षाने भाजप सरकारला धारेवर धरले आहे. लडाखमधील चिनी अतिक्रमणावरून सोनिया गांधी यांनी पुन्हा मोदींवर प्रश्नांचा भडिमार केला आहे. चीनपासून देशाच्या सीमारेषांचे संरक्षण करण्याची जबाबदारी केंद्र सरकार टाळू शकत नाही. मोदी सरकार केव्हा आणि कसा भारताची लडाखमधील भूमी चीनकडून माघारी घेणार आहे? असा प्रश्न त्यांनी सरकारला विचारला.
लडाखमधील परिस्थितीवरून देशाला आत्मविश्वासात घेण्याची मागणी सोनिया गांधी यांनी सरकारकडे केली. लडाखमध्ये शहीद झालेल्या जवानांच्या सन्मानार्थ काँग्रेसने 'स्पीक अप फॉर आवर जवान' हे अभियान सुरु केले आहे. जर चीनने भारताची भूमी बळकावली नाही, तर आपले 20 जवान कसे शहीद झाले? असा प्रश्न त्यांनी मोदी सरकारला केला.
भारत चीन सीमेवर संकट आले आहे. अशा काळत सरकार आपली जबाबदारी टाळू शकत नाही. चीनने भारताची भूमी घेतली की नाही, हे भारतीय जनतेला जाणून घ्यायचे आहे. पंतप्रधान मोदी चिनी अतिक्रमण झाले नसल्याचे म्हणत आहे. मात्र, तज्ज्ञ सॅटेलाईट छायाचित्रे पाहत आहेत. त्यामध्ये चीनी जवान भारतीय भूमीत असल्याचे म्हटले आहे, असे सोनिया गांधी म्हणाल्या.
मोदी सरकार केव्हा आणि कसा भारताची लडाखमधील भूमी चीनकडून माघारी घेणार आहेत. लडाखमध्ये आपल्या प्रादेशिक सार्वभौमत्ववाचे चीनकडून उल्लंघन झाले आहे का? सीमेवरील परिस्थितीवरून मोदी सरकार देशाला विश्वासात घेणार आहेत का? असा प्रश्न त्यांनी विचारला.