अमरावती (आंध्रप्रदेश) - भारत कोणावरही प्रथम हल्ला करणार नाही, मात्र कोणी हल्ला केल्यास त्यांना नक्कीच जन्माची अद्दल घडवेल, असा इशारा भारताचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी दिला आहे. विशाखापट्टनममधील एका कार्यक्रमात ते बोलत होते.
भारताकडे अत्याधुनिक युद्ध आणि यंत्र सामग्री आहे शिवाय तीन सुसज्ज अशी सैन्यदले देखील आहेत. कारण, भारतावर हल्ले होत राहतात. भारत कधीच युद्धाला सुरुवात करणार नाही, याची मी खात्री देतो. आम्ही युद्धाऐवजी नेहमीच शांततेला प्रधान्य देतो. आम्हाला माहिती आहे, प्रगतीसाठी-विकासासाठी विश्वशांती आवश्यक आहे. मात्र, अशांतता असेल तर विकासावर लक्ष केंद्रित करणे अवघड होते. काही लोकांना जगात अराजकता माजवायची आहे आणि आपल्या शेजाऱ्यांपैकी एक देश त्यांना पाठिंबा देतो आहे. दहशतवादाला आणि दहशतवाद्यांना चालना देत तो मानवतेचे आणि स्वतःचे देखील नुकसान करून घेत आहे. आम्हाला कोणाच्या वैयक्तिक गोष्टींमध्ये दखल द्यायची नाही, तसेच इतरांनी आमच्या अंतर्गत बाबींमध्ये दखल देऊ नये. जम्मू काश्मीरच्या संदर्भात बोलताना नायडू यांनी असे मत व्यक्त केले.
तसेच, काश्मीर मुद्याबाबत चर्चा करण्यासारखे काय आहे? १९५४ पासून तेथे निवडणुका होत आहेत, मुख्यमंत्री निवडले जात आहेत, राज्यसरकार आहे शिवाय खासदार आहेत. काश्मीर भारताचाच अविभाज्य घटक आहे. जर काही चर्चेसाठी राहिले असेल, तर ते म्हणजे पाकव्याप्त काश्मीर पाकिस्तानने भारताला सुपूर्द करावा, असेही नायडू यांनी यावेळी बोलताना म्हटले.