नवी दिल्ली - कोरोना विषाणूने बाधित झालेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे आयसीएसईने दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी गॅरी आर्थोन यांनी ३१ मार्चपर्यंत परीक्षा पुढे ढकलल्याची माहिती दिली. देशातील कोरोनाचा प्रभाव पाहून नव्याने तारखा जाहीर करण्यात येणार आहेत.
परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकानुसार होणार असल्याचे बुधवारी आयसीएसई बोर्डाने जाहीर केले होते. मात्र, आज परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सीबीएसईने सुद्धा दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत.
देशातील अनेक राज्यांनी कोरोनाच्या भीतीने खासगी आणि सरकारी सर्व शाळा महाविद्यालये बंद ठेवली आहेत. तसेच पर्यटन स्थळांसोबत सार्वजनिक ठिकाणे तात्पुरत्या स्वरूपात बंद केली आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी आता दहावी- बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. ऐन परीक्षांच्या काळात कोरोनाचा प्रसार झाल्याने परीक्षा पुढे ढकलण्याची वेळ आली आहे.