नवी दिल्ली/हेग - आंतरराष्ट्रीय न्यायालयात कुलभूषण जाधव प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान पाकिस्तानने हे प्रकरण स्थगित करण्याची मागणी केली. मात्र, ही मागणी न्यायालयाने फेटाळली. पाकिस्तानचे तात्पुरत्या काळासाठी नेमणूक करण्यात आलेले 'अॅड-हॉक जज्ज' तास्सादूक हुसेन जिलानी यांना सुनावणी तोंडावर असतानाच हृदयविकाराचा झटका आला. त्यांच्या तब्येतीच्या कारणावरून पाकिस्तानचे अॅटर्नी जनरल अन्वर मन्सूर खान यांनी ही मागणी केली होती.
प्रकरणाची ४ दिवसीय सुनावणी सुरू झाल्यानंतर पहिल्या फेरीत भारताने सोमवारी युक्तिवाद केला. त्यानंतर मंगळवारी पाकिस्तानने युक्तिवाद केला. जैश-ए-मोहम्मद या पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटनेने काश्मीरमध्ये भारतीय सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर मागील आठवड्यात बॉम्ब हल्ला केला होता. या पार्श्वभूमीवरच जाधव प्रकरणाची सुनावणी तणावपूर्ण वातावरणात सुरू आहे. यानंतरची सुनावणीची दुसरी फेरी अनुक्रमे भारत आणि पाकिस्तानकडून २० आणि २१ फेब्रुवारीला होणार आहे.
ठळक मुद्दे :
- कुलभूषण जाधव प्रकरणाच्या स्थगितीची पाकिस्तानची मागणी आंतरराष्ट्रीय न्यायालयाने फेटाळली
- पाकिस्तानने नवीन 'अॅड-हॉक जज्ज'च्या नेमणुकीची परवानगी मागितली होती. ही मागणीही न्यायालयाने फेटाळली.
- कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानने अधिकृत गोपनीयता कायद्याअंतर्गत दोषी ठरवले होते - खावर कुरेशी यांचा पाकिस्तानतर्फे युक्तिवाद
- जाधव भारताच्या गुप्तहेर यंत्रणेचे सदस्य आहेत. त्यांनी पाकिस्तानात आत्मघातकी हल्ले आणि दहशतवादाला प्रोत्साहन दिले. तसेच, पाकिस्तान-चीन कॉरिडॉरच्या महत्त्वाकांक्षी योजनेला धक्का पोहचवण्याचा प्रयत्न केला - अन्वर मन्सूर खान
- त्यांच्यावरील आरोप मागे घेऊन त्यांना मुक्त करण्याची मागणीचा विचार करू नये - पाकिस्तानी वकील
- पाकिस्तानच्या लष्कराने एका परदेशी नागरिकावर कारवाई करताना त्यांचे मूलभूत अधिकार नाकारले. तसेच, त्यांनी स्वतःला निर्दोष सिद्ध करण्याची संधीही दिली नाही. तसेच, त्यांच्या चौकशीत पारदर्शकता ठेवली नाही, असा युक्तिवाद काल भारताचे वकील हरीष साळवे यांनी केला होता. तसेच, जाधव यांच्या विचित्र आणि चुकीचे आरोप लावल्याचेही त्यांनी म्हटले होते. पाकिस्तानने जाधव यांचे इराणमधून अपहरण केल्याचा आरोप भारताने केला आहे.
- जाधव यांना पाकिस्तानने ३ वर्षांपासून विनाकारण डांबून ठेवले आहे. तसेच, भारताच्या परराष्ट्र वकीलातीने जाधव यांच्याशी संपर्क करू देण्यासाठी पाकिस्तानला १३ वेळा विनंती केली होती. मात्र, पाकिस्तानने याकडे काणाडोळा करून व्हिएतनाम कराराचे उल्लंघन केले आहे.