लुझियाना (अमेरिका) : संपूर्ण जग सध्या कोरोनाचा लढा लढत आहे. प्रत्यक्षात कोरोनाची लागण झालेले नागरिक मात्र प्राणपणाने लढा देत आहेत. यात काही जणांचा जीव जात आहे, तर काही जण मरणाच्या दारातून परत येत आहे. परंतु अमेरिकेतील लुझियाना या प्रांतातील एका 12 वर्षीय मुलीने कोरोनाशी दिलेल्या लढा पाहून सर्व जण आश्चर्यचकित झाले आहेत. ज्युलियट नावाची ही मुलगी कोरोनामुळे एका क्षणाला मृत झाल्याचे वाटत असतानाच डॉक्टरांच्या प्रयत्नानने ती पुन्हा सावरली आणि आता तर कोरोनातून ठणठणीत बरी देखील झाली आहे.
हेही वाचा... ईटीव्ही भारत विशेष : लॉकडाऊनच्या काळात कर्तव्यावर रुजू असलेल्या महाराष्ट्र पोलिसांपुढील समस्या आणि शासनाचे उपाय
ज्युलियटचा कोरोना व्हायरसचा प्रवास इतर रुग्णांसारखा नव्हता. सुरुवातीला तीला श्वासोच्छवासाची समस्या, पोटदुखी आणि उलट्या झाल्या. तिची आई रेडिओलॉजिस्ट असल्याने त्यांनी कदाचित हे अॅपेंडिसाइटिस आहे. अथवा पोटाची काही समस्या असावी म्हणून तसे उपचार घेण्यास सुरुवात केली. पण नंतर ज्युलियटचे ओठही निळे झाले होते आणि तिचे अवयव थंड पडत होते. तिला त्वरित स्थानिक रुग्णालयात नेले. तिथे तिला हृदयविकाराचा झटका आला. त्यावेळी तिचा सीपीआर करावा लागला. तेव्हा ती मरणाच्या दारातून परत आली.
यानंतर तिला दुसऱ्या रुग्णालयात नेण्यात आले. जिथे तीला दहा दिवस ठेवण्यात आले. यावेळी डॉक्टरांनी तपासणी दरम्यान काही मुलांना कोरोना विषाणूची लक्षणे आढळत नाही. मात्र, सौम्य किंवा मध्यम लक्षणे यातूनच पुढे गंभीर परिस्थिती होऊन अगदी मृत्यूच होतो, असेही सांगितले. या दरम्यान ज्युलियट चार दिवस व्हेंटिलेटरवर होती. 15 एप्रिल रोजी तिला डिस्चार्ज मिळाला. डॉक्टरांनी सांगितले की, तिच्या हृदयाचे कार्य आता पूर्णपणे सामान्य झाले आहे. सध्या ज्युलियट तिच्या 5 वर्षांच्या भावासोबत खेळत आहे आणि भांडत आहे. एकूणच मरणाच्या दाराशी जाऊन पुन्हा जन्म घेतलेल्या या मुलीचा लढा अनेकांना प्रेरणा देणारा आहे.