हैदराबाद - बिग बॉस तेलुगु सीझन-३ मध्ये प्रतिस्पर्धी म्हणून अंतिम फेरीत निवड करण्यासाठी आयोजकांनी आपल्याकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा खळबळजनक आरोप महिला पत्रकाराने केला आहे. बिग बॉस तेलुगु सीझन-३ हा रिअॅलिटी शो २१ जुलैपासून सुरू होत आहे.
बंजारा हिल्स येथे कार्यरत असलेले पोलीस उप-आयुक्त के. एस राव यांनी माहिती देताना सांगितले, १३ जुलैला आम्हाला महिला पत्रकार आणि निवेदिकेची तक्रार मिळाली. तक्रार करताना महिलेने सांगितले, तिला मार्च महिन्यात बिग बॉस तेलुगुची ऑफर मिळाली. तिला २१ जुलैपासून सुरू होणाऱ्या बिग बॉस कार्यक्रमामध्ये प्रतिस्पर्धी म्हणून निवडण्यात आले आहे, असे सांगण्यात आले. तिने ऑफरला होकार देताना स्पर्धेच्या आयोजकांची भेट घेतली. भेटीदरम्यान, आयोजकांपैकी चौघांनी तिच्यासोबत गैरवर्तन केले. यासोबतच अंतिम फेरीत निवड होण्यासाठी बॉसला खूश करावे लागेल, असे तिला सांगितले. याप्रकरणी चौघांविरोधात भा.दं.वि नुसार कलम ३५४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे
महिला पत्रकार हैदराबाद शहरातील नामांकित माध्यम कंपनीमध्ये निवेदिका म्हणून काम करते. तिने घटनेविषयी माहिती देताना सांगितले की, आयोजकांनी माझ्यासोबत कोणताही करार केला नाही. अंतिम फेरीत सहभागी होण्यासाठी त्यांनी मला बॉसला खूष करण्यास सांगितले. यावेळी त्यांनी माझ्यासोबत गैरवर्तवणूकही केली.