हैदराबाद - गेल्या चार ते पाच दिवसांपासून हैदराबादसह तेलंगाणा राज्यात जोरदार पाऊस पडला आहे. त्यामुळे अनेक जणांचा मृत्यू झाला असून कोटींचे नुकसान झाले आहे. राज्यातील पूरपरिस्थितीचा आढावा तेलंगाणाचे नगरपालिका प्रशासन व नगरविकास मंत्री के.टी. रामाराव यांनी घेतला. ग्रेटर हैदराबाद नगर निगम मुख्यालयात महापौर राममोहन आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली.
हैदराबादच्या एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस होण्याची ही दुसरी वेळ आहे. पावसामुळे आतापर्यंत 70 जणांचा मृत्यू झाला आहे. यात हैदराबाद नगर निगममधील 33 लोकांचा समावेश आहे. आतापर्यंत 29 मृताच्या कुटुंबीयांना 5 लाखांची मदत करण्यात आली आहे. मुसळधार पावसामुळे हैदराबादचे अंदाजे 670 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. नुकसान अहवाल केंद्र सरकारला पाठवण्यात आला आहे. यावर केंद्र सरकार लवकरच मदत करेल, अशी आशा आहे, असे के.टी. रामाराव म्हणाले.
येते 3 दिवस पाऊस पडण्याची शक्यता आहे. पावसामुळे ज्या ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तेथील लोकांना अलर्ट करण्यात येत आहे. तसेच पूरग्रस्तांना पूर्ण मदत करण्यात येत आहे. आतापर्यंत पूरग्रस्तांना 45 कोटींचे साहित्य वाटप करण्यात आले आहे. तर 60 कोटी रुपये वीज, पाण्याचे पाइप्स पुनर्संचयित करण्यासाठी खर्च केले आहेत, असेही ते म्हणाले. पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा झाल्याने देशात तेलंगणसह महाराष्ट्र, कर्नाटकला अतिवृष्टीचा फटका सहन करावा लागला आहे.