श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या अवंतीपोरामध्ये सोमवारी झालेल्या चकमकीत हिजबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा एक अतिरेकी सुरक्षा दलांना शरण आला. या अतिरेक्याचे नाव साकिब अकबर वझा असे आहे. तो पुलवामाच्या गुलशानपूरा भागातील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
एका दहशतवाद्याचा खात्मा..
सोमवारीच पुलवामाच्या नूरपोरामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला. या दहशतवाद्याची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.
साकिबचे पुनर्वसन..
शरण आलेला दहशतवादी साकिब हा उच्चशिक्षित आहे. तो पंजाबच्या पटियालामधून बी. टेक करत आहे. काश्मीर पोलिसांनी साकिब शरण आलेल्या घटनेचा व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये तो सुरक्षा दलांचे आभार मानत आहे.
आवाहन..
आपल्याला नवे आयुष्य सुरू करण्याची संधी दिल्याबद्दल साकिबने सुरक्षा दलांचे आभार मानले आहेत. २५ सप्टेंबरला तो हिजबुल मुजाहिदीनमध्ये सहभागी झाला होता. मात्र, लवकरच त्याला आपली चूक कळाली. सुरक्षा दलांना शरण आल्यानंतर, आता त्याने इतरांनाही दहशतवादी संघटनेत सहभागी न होण्याचे आवाहन केले आहे.
बडगाम, शोपियानमध्ये कारवाया..
या महिन्यात भारतीय लष्कराने काश्मिरात विविध ठिकाणी सर्च ऑपरेशन राबवले आहेत. सात ऑक्टोबरला शोपियानमध्ये तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. तर सोळा ऑक्टोबरला बडगामध्ये झालेल्या चकमकीत एका दहशतवाद्याला ताब्यात घेण्यात आले होते.
हेही वाचा : थकित वेतन मागितल्याने एकाला जिवंत जाळले..अलवरमधली घटना