शिमला - एकीकडे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत चालला आहे. तिथे हिमाचल प्रदेशच्या हमीरपूर येथील शैलजा चंदेल या तरुणीने समाजापुढे नवा आदर्श उभा केला आहे. शैलजा हिने कोरोना विषाणू संबंधित आरोग्य चाचणीकरता शरीर (देह दान) दान करण्याची घोषणा केली आहे.
चीनमध्ये कोरोना विषाणूची प्रथम सुरुवात झाली असली तरी आता त्याचा प्रसार जगभर झाला असून अत्यंत कमी वेळेत याची लस तयार करण्याचे आवाहन जगभरातील संशोधकांसमोर आहे. भारतातही या महामारीवर लगाम घालण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अशातच, मानवी शरीरावर चाचण्या आणि प्रयोग करून लस शोधण्यास मदत व्हावी या उद्देशातून शैलजाने ही घोषणा केली आहे.
कोरोनासारख्या महामारीवर अद्याप औषध किंवा लस मिळाली नसून वैज्ञानिक जीवाचे रान करून प्रयत्न करताहेत. महत्वाचे म्हणजे, जेव्हा एखाद्या मोठ्या रोगावर उपायात्मक संशोधन करण्यासाठी एका निरोगी आणि सुदृढ मानवी शरीराची आवश्यकता असते. यामध्ये, प्रथम निरोगी मानवी शरीरावर त्या संसर्गाचे विषाणू इंजेक्ट करुन त्यानंतर औषधी किंवा लस तयार करण्याकरता लागणाऱ्या प्रत्येक बाबींवर अभ्यास केला जातो. शैलजाने कोरोना सारख्या महामारीवर उपाय शोधण्यासाठी स्वत:चे शरीर दान करण्याचे धाडस केल्याबद्दल तिचे सर्व स्तरावर कौतुक होत आहे.