नवी दिल्ली - आज तिसऱ्या लॉकडाऊनचा अखेरचा दिवस आहे. भारतातील कोरोना संसर्गाच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. गेल्या 24 तासात देशात एकूण 4 हजार 987 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 120 जण दगावले आहेत. मागील आकडेवारीच्या तुलनेत आतापर्यंत 24 तासात आढळलेला हा सर्वांत मोठा आकडा आहे.
देशातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 90 हजार 927 झाला आहे, यात 53 हजार 946 अॅक्टिव्ह केस आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. तर 34 हजार 109 जण पूर्णत: बरे झाले आहेत. तसेच 2 हजार 872 जणांचा मृत्यू झाल्याची माहितीही आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
महाराष्ट्रामध्ये 30 हजार 706 कोरोनाबाधित असून 1 हजार 135 जणांचा मृत्यू झाला आहे. गुजरातमध्ये 10 हजार 988 कोरोनाबाधित असून 625 जणांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीमध्ये 9 हजार 333 कोरोनाबाधित तर 129 जणांचा मृत्यू झाला आहे. या पाठोपाठ तामिळनाडूमध्ये 10 हजार 585 कोरोनाबाधित तर 74 जणांचा मृत्यूची नोंद झाली आहे.
कोरोनाला रोखण्यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोरोनाग्रस्तांची चाचणी लवकर होणे आणि त्यांचे निदान कमीत-कमी वेळेत होणे. यासाठी सरकार परप्रांतीय कामगार आणि परदेशातून परत आलेल्यांची कोरोना चाचणी 'आरटी-पीसीआर' आधारित 'पूल टेस्टिंग' द्वारे करणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी ग्रीन झोनमध्ये परत जाणाऱया लोकांसाठी 'आरटी-पीसीआर' आधारित 'पूल टेस्टिंग' संबंधी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.
कशी संपते कोरोना साखळी -
एका कोरोनाग्रस्तापासून दुसऱ्या व्यक्तीला लागण होण्याची साखळी तोडण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. एखाद्या भागात 28 दिवसात एकही नवी कोरोनाची केस आढळली नाही, आणि शेवटी आढळलेल्या रुग्णाची चाचणी निगेटिव्ह आली तर रुग्णांची साखळी तुटली असे समजण्यात येते.