भोपाल- जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. राज्यातही कोरोनाचा विषाणू झपाट्याने पसरत आहे. अशा परिस्थितील जीव धोक्यात घालून डाॅक्टर रुग्णांवर उपचार करीत आहेत. मात्र, इंदौर येथील कोर्णाक नगरमध्ये उपचारासाठी जाणाऱ्या डाॅक्टरांचा रुग्णांच्या नातेवाईकांनी विरोध केला आहे. उपचारासाठी आलेल्या डाॅक्टरांच्या पथकावर येथील स्थानिक नागरिकांनी दगडफेक केल्याचा प्रकार घडला आहे.
हेही वाचा- शोएब अख्तर म्हणतोय, कोरोना लोकांना कंगाल करून सोडणार
इंदौर येथील प्रशासनाने रानीपुरा, टाट पट्टी बाखल, चंदन नगर, आजाद नगर, खजराना, मुंबई बाजार सह सहा ठिकाणाला कोरोना अतिसंवेदनशील परिसर म्हणून घोषित केले आहे. येथील संशयित लोकांना क्वारंटाईन करण्यसाठी रुग्णालयात नेले जात आहे. त्यामुळे येथील नागरिकांचा डाॅक्टरांवर संताप आहे. त्यामुळे याठिकाणी डाॅक्टर आल्यावर येथील नागरिक त्यांच्यावर दगडफेक करीत आहेत. त्यामुळे आता या परिसरामध्ये पोलीसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
दरम्यान, देशातील 32 राज्यांसह केंद्रशासित प्रदेशांनी 31 मार्चपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन जाहीर केले होते. मात्र, हा आदेश झुगारून लोक रस्त्यावर गर्दी करत आहेत. आवश्यकता भासल्याने संचारबंदी लागू करण्याचे निर्देश केंद्राने दिले होते. त्यानंतर 24 मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांसाठी अखेर देशव्यापी लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्याचा आज नववा दिवस आहे.