नवी दिल्ली - कोरोना विषाणूने भारतामध्ये हात-पाय पसरायला सुरुवात केली आहे. भारतामध्ये कोरोना विषाणू बाधीत रुग्णाची संख्या 114 वर पोहोचली आहे. या पार्श्वभूमीवर सरकारकडून नागरिकांसाठी 24 तास उपलब्ध असलेला हेल्पलाईन क्रमांक जारी केला आहे.
आरोग्य मंत्रालयाने 24 तास उपलब्ध असलेला 011 - 239780-46 हा दूरध्वनी मदत क्रमांक सुरू केला आहे. तसेच नागरिक 104 या क्रमांकावर आणि ncov2019@gmail.com या ई-मेल आयडीवरही संपर्क साधू शकतात, असे आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.
महाराष्ट्रातही नागरिक कोरोनाविषयक मदतीसाठी 020 - 26137394 या राज्यस्तरीय तसंच मुंबई महानगरपालिकेच्या 1916 या मदत क्रमांकावर संपर्क करू शकतात.
दरम्यान कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी काही प्रतिबंधात्मक उपाययोजनांचं पालन करावं, असं आवाहन केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने केले आहे. महाराष्ट्रात सध्या एकूण 39 जण कोरोना विषाणूने बाधित झाले आहेत.