बंगळुरू - माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा कर्नाटकातून राज्यसभेची निवडणूक लढणार आहेत. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या वतीने हा निर्णय आपण जाहीर करत असल्याचं देवेगौडा यांचे चिरंजीव एचडी कुमारस्वामी यांनी जाहीर केलेे आहे. काँग्रेसने राज्यसभेसाठी देवेगौडा यांनी पाठिंबा जाहीर केला आहे. मंगळवारी देवेगौडा यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे.
कुमारस्वामी म्हणाले की, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, अनेक राष्ट्रीय नेते आणि पक्षाच्या आमदारांच्या विनंतीनंतर माजी पंतप्रधानांनी हा निर्णय घेतला आहे. माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी यश आणि पराभव पाहिले आहेत. लोकांमुळे त्यांनी उच्च पदांवर कब्जा केला आहे. देवगौडा यांना राज्यसभेसाठी राजी करणे हे सोपे काम नव्हते, असे कुमारस्वामी म्हणाले.
कर्नाटकात राज्यसभेवर जाण्यासाठी प्रत्येक उमेदवाराला ४४ मतांची गरज आहे. त्यामुळे देवेगौडा यांना विजयासाठी काँग्रेसची गरज आहे. देवेगौडा निवडणूक न लढल्यास तिसरा उमेदवार देणार असल्याचं भाजपने सांगितलं होतं. जेडीएसकडे सध्या ३४ मते आहेत. पण उर्वरित मतांसाठी काँग्रेस पाठिंबा देणार आहे.