अलाहाबाद - माजी बीएसएफ जवान तेज बहादुर यादव यांनी दाखल केलेल्या याचिकेची अलाहाबाद उच्च न्यायालयाने दखल घेतली आहे. उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आल्याने त्यांना निवडणूक लढविण्यात अपयश आले होते. त्यांनी याबाबत याचिका दाखल केली होती, न्यायालयाने या प्रकरणी नरेंद्र मोदी यांना आता नोटीस बजावली आहे.
बीएसएफचे जवान तेज बहादुर यादव यांनी वाराणसी विधानसभा मतदारसंघातून नरेंद्र मोदी यांच्या विरोधात समाजवादी पार्टीकडून उमेदवारी अर्ज भरला होता. परंतु, निवडणूक अधिकाऱ्यांनी अर्जातील त्रुटींमुळे त्यांचा अर्ज बाद केला होता. यानंतर तेज बहादुर यादव यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यादव यांचा उमेदवारी अर्ज नाकारण्याचे कारण म्हणजे, बीएसएफने त्यांना भ्रष्टाचार किंवा असभ्यतेपैकी कोणत्या कारणाने काढून टाकले होते, ते प्रमाणपत्र जमा करण्यात अपयश आले होते.
तेज बहादुर यादव यांनी यानंतर न्यायालयात याचिका दाखल करून आपला अर्ज चुकीच्या पद्धतीने बाद करण्यात आल्याचे सांगितले होते. 'नरेंद्र मोदींना खासदार बनता यावे, म्हणून माझी कोणतीही बाजू ऐकूण न घेता आपला अर्ज बाद करण्यात आल्याचे यादव यांनी न्यायालयाला सांगितले होते. न्यायालयाने त्यांची बाजू ऐकूण घेतली. न्यायालयाने यादव यांची बाजू ऐकून घेतल्यानंतर आपला निर्वाळा देत, 'तेज बहादुर यादव यांची बाजू ऐकूण न घेता त्यांचा उमेदवारी अर्ज बाद केला आहे, असे दिसून येत आहे. यामुळे न्यायालयाने नरेंद्र मोदी यांना नोटीस पाठवली आहे.