राजकोट - गुजरात काँग्रेसचे नेते आणि पाटीदार आरक्षण आंदोलनाचं नेतृत्व करणारे हार्दिक पटेल गेल्या 20 दिवसांपासून बेपत्ता आहेत. हार्दिक पटेल बेपत्ता असल्याचा दावा त्यांची पत्नी किंजल पटेल यांनी केल्याने एकच खळबळ उडाली आहे. पाटीदार समाजाच्या एका कार्यक्रमामध्ये त्यांनी हा दावा केला आहे.
किंजल पटेल यांनी गुजरात प्रशासनावर आरोप केला आहे की, माझे पती बेपत्ता असून ते कुठे आहेत, याबाबत काहीच माहिती नाही, असे किंजल यांनी म्हटले आहे.
हार्दिक पटेल यांना अजामीनपात्र वॉरंटवरून 18 जानेवारीला देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आलं होतं, तेव्हापासून ते घरी परतलेले नाहीत. 2015 मध्ये पाटीदार आरक्षणाच्या चळवळीशी संबंधित देशद्रोहाच्या खटल्यांचा आरोप पटेल यांच्यावर आहे.
खटल्यांच्या सुनावणीदरम्यान हजर न झाल्याने कोर्टाने जारी केलेल्या अजामीनपात्र वॉरंटवरून 18 जानेवारी रोजी पटेल यांना अटक केली होती. त्यावर 24 जानेवरीला हार्दिक पटेल यांना जामीन मिळाला होता. मात्र, पाटण आणि गांधीनगर जिल्ह्यातील दोन खटल्यांप्रकरणी त्यांना परत अटक करण्यात आली. त्यानंतर या दोन्ही प्रकरणी 24 जानेवरीला रोजी जामीन मिळाला होता. दरम्यान पुन्हा 7 फेब्रुवारीला त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते.