नवी दिल्ली - राष्ट्रीय शैक्षणिक धोरण कुठल्याही प्रकारचा दुजाभाव करते असा आरोप देशभरातून कोणीच न करणे ही खूप आनंदाची गोष्ट आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्या शैक्षणिक धोरणाचे स्वागत केले. वर्तमान आणि भविष्यातील पिढ्यांना सर्वशक्तिमान बनवणे हाच नव्या शैक्षणिक धोरणाचा मुख्य उद्देश असल्याचेही मोदी म्हणाले. 'राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातंर्गत उच्च शिक्षणातील सुधारणा' या विषयावर आयोजित ऑनलाइन कार्यक्रमाला पंतप्रधान मोदी यांनी संबोधित केले.
'नवे शैक्षणिक धोरण अत्यंत महत्त्वाचे आहे. यासाठी गेल्या ४ वर्षांपासून यांसदर्भात चर्चा सुरू होती. लाखो लोकांनी सुचवलेल्या सल्ल्यांचाही यामध्ये विचार करण्यात आला आहे, असे मोदी यांनी सांगितले. आज संपूर्ण देशात नव्या शैक्षणिक धोरणाची चर्चा होत आहे. सरकारच्या या नव्या धोरणाबाबत विविध क्षेत्रातील लोक त्यांची मते व्यक्त करत आहेत. अशी चर्चा होणे गरजेचेही आहे. याविषयी जास्त चर्चा झाल्यास त्याचा या धोरणालाच फायदा होईल', असेही मोदी यांनी यावेळी सांगितले.
'नव्या शैक्षणिक धोरणात कुठलाही भेदभाव नाही. हे धोरण नव्या भारताची पायाभरणी करणारी ठरणार आहे. यामुळे मुलांमध्ये शिक्षणाची ओढ निर्माण होईल. नव्या धोरणात स्थानिक भाषेवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. सर्व मुले पाचवीपर्यंत आपल्या मातृभाषेत शिक्षण घेऊ शकतील, असेही मोदी म्हणाले. आपल्याला विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे बनवायचे आहे. आपली शिक्षण व्यवस्था अनेक वर्षे जुन्या ढाच्यावर उभी होती, ज्यामुळे नव्या विचारांना मार्ग मिळत नव्हता, असेही ते म्हणाले. प्रत्येक देश आपल्या शिक्षण व्यवस्थेला आणि संस्कारांना जोडून पुढे जात असतो. हे नवे शैक्षणिक धोरण एकविसाव्या शतकातील भारताची पायाभरणी करेल. ज्या शिक्षणाची तरुणांना गरज आहे त्या सर्व गोष्टींचा या नव्या धोरणात अंतर्भाव करण्यात आला असल्याचेही मोदी म्हणाले.