राजस्थान - गुर्जर आरक्षणाच्या समस्येवर तोडगा काढावा तसेच विविध मागण्यांसाठी गुर्जर समाजाच्यावतीने आज राजस्थानमध्ये आंदोलन सूरू आहे. आरक्षणासाठी रुळावर उतरलेला गुर्जर समाज आपल्या विविध मागण्यांसाठी पुन्हा एकदा आंदोलनाच्या मार्गावर आहे. गुर्जर नेते कर्नल किरोरी बैंसला यांचा मुलगा विजय बैंसला यांनी आजपासून चक्काजाम आंदोलन करणार असल्याचे जाहीर केले होते.
पिलपुरा रेल्वे रुळावर गुर्जर समाजातील 200-250 लोकांनी एकत्र येत आंदोलन केले. यावेळी अशोक चंदना मुर्दाबाद अशा घोषणा देण्यात आल्या. तसेच गुर्जर समाजातील लोकांनी रेल्वे रूळाचे नुकसान करण्याचादेखील प्रयत्न केला. दरम्यान शनिवारी गुर्जर समाजाच्या प्रतिनिधींनी सरकारशी चर्चा करत 14 मुद्यांवर करार केला. तरीही मागणी पूर्ण न झाल्याबद्दल बैंसला गट अजूनही नाराज आहे. तसेच सरकारशी चर्चा केलेल्या प्रतिनिधी मंडळाचे सदस्य असलेले माजी सरपंच यादवराम यांनी सरकारशी त्यांची चर्चा यशस्वी झाल्याचे सांगितले आहे.
या आंदोलनासाठी पोलिस आणि प्रशासनाने कडेकोट बंदोबस्त केला आहे. मोठ्या प्रमाणावर गुर्जर समाज असलेल्या भागांमध्ये 2800 पोलीस कर्मचारी तैनात केले आहेत. तसेच जिल्हाधिकारी नाथमल दीडल आणि आयजी संजीव नारजरी यांनी बयाना व पिलुकपुरा गावाला भेटी दिल्या. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने जयपूरमधील ग्रामीण भागांसह दौसा, करौली, सवाई माधोपूर आणि भरतपूरसह मोठ्या प्रमाणावर गुर्जर समाज असलेल्या जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
अशी आहे कायदा व सुव्यवस्थेची स्थिती
पोलिसांच्या तीस तुकड्या हे आंदोलन सांभाळणार आहे. तसेच सात होमगार्डच्या तुकड्यादेखीस तयार करण्यात आल्या आहेत. दोन रॅपिड अॅक्शन फोर्स आणि आठ सीआरपीएफच्या तुकड्यासाठी केंद्र सरकारकडे मागणी करण्यात आली आहे. तसेच सहा एसपी, डेप्युटी एसपी यांच्यासह 2800 पोलीस कर्मचाऱ्यांची तैनाती करण्यात आली आहे.