गांधीनगर - नवरदेवाच्या बहिणीनेच नवरी मुलीशी लग्न केल्याची घटना तुम्ही कधी ऐकये का? ही घटना घडली आहे गुजरातमधील छोटा उदयपूर येथे. येथे नवरदेवाऐवजी चक्क त्याच्या बहिणीनेच नवरी मुलीशी लग्न केल्याची घटना घडली आहे. जाणून घेऊया या लग्नाची खासियत.
गुजरातच्या छोटा उदयपूर येथील सुरखेडा, सनाडा आणि अंबल या तीन गावांतील आदिवासी समाजात, अशा पद्धतीने लग्न केले जाते. या गावात लग्नात नवरदेव शेरवानी घालून, फेटा बांधून लग्नासाठी तयार होतो. परंतु तो लग्नात सहभागी होत नाही. त्याऐवजी त्याची अविवाहित बहिण किंवा त्याच्या घरातील इतर एखादी अविवाहित महिला नवरी मुलीशी लग्न करते. प्राचीन काळापासून याठिकाणी ही परंपरा सुरू आहे.
लग्नात वऱ्हाड घेऊन येण्यापासून ते सात फेरे घेण्यापर्यंत सर्व विधी नवरदेवाची बहीणच पूर्ण करते. हा लग्नसोहळा पूर्ण होईपर्यंत नवरदेव आपल्या आईसोबत घरीच राहतो, असे सुरखेडा गावातील ग्रामस्थ कांजीभाई रातवा सांगतात.
गावात प्राचीन काळापासूनच अशा पद्धतीने विवाह केले जात आहे. या परंपरेमुळे आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडते, असे या गावातील ब्राम्हण सांगतात.
जे लोक या परंपरेला नाकारतात त्यांच्यासोबत दुर्दैवी घटना घडते. अशा पद्धतीने लग्न न करणाऱ्या लोकांचे लग्न मोडते किंवा त्यांच्या संसारात अडचणी निर्माण होतात किंवा याप्रकारच्या इतर समस्या उद्भवतात. अशी काही उदाहरणे गावात यापूर्वी पाहायला मिळाल्याचे सुरखेडा गावचे मुख्य रामसिंगभाई रातवा यांचे म्हणणे आहे.
आख्यायिकेनुसार, सुरखेडा, सनाडा आणि अंबल या तीन गावांतील ग्रामस्थ ही परंपरा पाळतात. लग्नाच्यावेळी नवरदेवाला ते घरीच थांबवतात. यामुळे नवरदेवाला कोणत्याही प्रकारची हानी होत नाही, असे या गावातील ग्रामस्थ मानतात.