नवी दिल्ली - कोरोनाचा प्रसार भारतात झाल्यानंतर स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा देता आल्या नाहीत. केंद्रीय लोकसेवा आयोगानेही परीक्षेच्या वेळापत्रकात बदल केला केला होता. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देण्यासाठी वयाची आणि किती वेळा परीक्षा देता येतील याची अट आहे. शेवटची संधी असलेल्या विद्यार्थींना आणखी एक संधी देण्याचा केंद्र सरकार विचार करत असल्याची माहिती सरकारने सर्वोच्च न्यायालयात दिली.
सरकारकडून गांभीर्याने विचार -
नागरी सेवा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर आज एम. खानविलकर, बी. आर गवई आणि कृष्णा मुरारी यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना आणखी एक संधी मिळावी, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली होती. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आणखी एक संधी द्यायची की नाही, हा विषय सरकारच्या विचाराधीन असल्याची माहिती, सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयात सांगितली.
परीक्षा पुढे ढकलण्यासही दिला होता नकार -
याआधी ३० नोव्हेंबरला, सर्वोच्च न्यायालयाने युपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्यास नकार दिला होता. ४ ऑक्टोबरला यूपीएसीची परीक्षा होणार होती. मात्र, त्यावेळी देशातील कोरोनाचा प्रसार आणि अनेक भागांतील पूरपरिस्थिती पाहता परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी सरकारने केली होती. ही मागणी न्यायालयाने फेटाळली होती.