नवी दिल्ली - कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी) पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि सरचिटणीस सिताराम येचुरी यांनी शेतकरी आंदोलनावरून भाजप सरकारवर हल्लाबोल केला आहे. लाल किल्ल्यावरील घटनेच्या आडून सरकार शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करू शकत नाही, असे ते म्हणाले. प्रजासत्ताक दिनी शेतकरी आंदोलकांनी लाल किल्ल्यावर कब्जा केला होता. निशाण साहीबचा ध्वज किल्ल्यावर फडकावला. आंदोलकांसोबत पोलिसांची झटापट झाली तसेच तोडफोड करण्यात आली. त्यानंतर आता सरकारकडून आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न होत आहे.
आंदोलन दडपण्याचा प्रयत्न -
व्हर्च्युअली आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत येचुरी बोलत होते. यावेळी ते म्हणाले, प्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांनी आयोजित केलेल्या ट्रॅक्टर रॅलीत कट करून हिंसाचार घडवून आणला. सरकारला हिंसाचाराचे कारण मिळाले असून आता त्याआडून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न होत आहे. मोठ्या प्रमाणात शेतकरी ठरलेल्या मार्गावरून मोर्चा काढत होते. मात्र, काही ठराविक गटाने मार्ग बदलला आणि गोंधळ घातला. ज्या मार्गावरून लाखो शेतकरी शांततेत चालले होते तेथे जाणूनबुजून हिंसाचार घालण्यात आला, असे येचुरी म्हणाले.
१६ पक्षांचा अभिभाषणावर बहिष्कार -
संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. देशातील १६ विरोधी पक्षांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने तीन कृषी विधेयके घाईघाईने मंजूर केले. या कृतीचा निषेध करण्यासाठी विरोधी पक्षांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणावर बहिष्कार टाकला आहे. त्यामुळे हे अधिवेशन कृषी कायद्यांमुळे चांगलेच गाजणार आहे.