नवी दिल्ली - भारतात कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. नागरिकांना घरात राहण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत. तर प्रशासकीय पातळीवर कोरोनाशी लढा देण्याचे काम सुरू आहे. अशा वातावरणात सीएए, एनपीआर, तीन महिन्यांसाठी रद्द करण्याची मागणी ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सलमान खुर्शिद यांनी केली आहे. तीन महिन्यानंतर पुन्हा यावर काय करायचे त्यावर चर्चा करता येईल, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
सरकारने सीएए, एनआरसी, एनपीआर विरोधी आंदोलकांशी चर्चा करायला हवी. गर्दीतून कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होवू शकतो. त्यामुळे आंदोलन मागे घेण्यासाठी विनंती सरकारने त्यांना करावी, असे खुर्शिद म्हणाले. २२ मार्चला घराबाहेर येऊन आरोग्य सेवा पुरवणाऱ्या व्यक्तीना टाळ्या, घंटानाद आणि थाळ्या वाजवून अभिवादन करण्याचे आवाहन पंतप्रधान मोदींनी गुरुवारी केला आहे. असे करण्याचे गरज नाही. मात्र, अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्यांचे आपण आभार मानायाला पाहिजे, असे ते म्हणाले.
खुर्शिद म्हणाले की, उत्तरप्रदेश आणि केंद्र सरकराने सीएए विरोधी आंदोलकांची भेट घ्यावी, कोरोनामुळे तीन महिन्यांसाठी सर्वकाही पुढे ढकलण्यात येईल असे त्यांना सांगावे. सरकारने चांगल्या भावनेतून हे काम करावे.
भारातमध्ये कोरोनाचे २४९ रुग्ण आढळून आले आहेत. तर पाच जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. परदेशातून येणाऱ्या नागरिकांवरही निर्बंध लादण्यात आले आहेत. तर अनेक देशांतून भारतात येण्याजाण्यास बंदी घालण्यात आली आहे. देशामध्ये तपासणी प्रयोगशाळांची संख्या वाढवण्यात आली आहे. तसेच अनेक संशयितांवर आरोग्य विभाग बारीक नजर ठेवून आहे. परिस्थितीचा आढावा घेवून उपाययोजना राबवण्यात येत आहेत. देशातील छोट्या मोठ्या शहरांमध्येही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.