नवी दिल्ली - संपूर्ण देशाचे लसीकरण करण्याबाबत सरकारने कधीही म्हटले नाही, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सचिवांनी आज स्पष्ट केले. आपण फक्त ज्यांना गरज आहे, अशांनाच कोरोनाची लस दिली कोरोनाची साखळी तोडू शकतो. असे झाल्यास संपूर्ण लोकसंख्येचे लसीकरण करण्याची आवश्यकता नाही, असे इंडियन मेडिकल कौन्सिलचे अध्यक्ष डॉ. बलराम भार्गव म्हणाले.
सर्वांना लसीची गरज नाही
ऑक्सफर्ड विद्यापीठाने तयार केलेल्या कोरोना लसीचा आणीबाणीच्या काळात वापर करण्यासाठी सीरम इन्स्टिट्यूट परवाना मागणार आहे. ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. अशातच देशातील सर्व नागरिकांचे लसीकरण करण्याचे सरकारने कधीही म्हटले नाही, असे आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी स्पष्ट केले. सीरम इन्स्टिट्यूटच्या कोविशिल्ड कोरोना लसीच्या चाचणीतील अडथळ्यांमुळे बाजारात लस येण्यास वेळ लागणार नाही, त्या वेळापत्रकावर काहीही परिणाम होणार नाही, असेही राजेश भूषण म्हणाले.
कोरोनावरील लसीच्या कार्यक्षमतेवर लसीकरण कार्यक्रम अवलंबून असून संसर्गाची साखळी तोडणे हा मुख्य हेतू आहे. जर आपण काही ठराविक गरज असलेल्यांचेच लसीकरण केले तर कोरोनाची साखळी तुटेल. त्यामुळे आपल्याला संपूर्ण देशाचे लसीकरण करण्याची गरज नाही, असे आयसीएमआरचे अध्यक्ष बलराम भार्गव म्हणाले.