जयपूर (राजस्थान) - कोरोना विषाणुचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन ३ मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. मात्र, लॉकडाऊन असूनदेखील राज्यातील शासकीय कार्यालये २० एप्रिलपासून उघडली जाणार आहेत.
राज्याच्या प्रशासकीय सुधार विभागाचे अतिरीक्त मुख्य सचिव आर. व्यंकटेश्वरण यांनी दिलेल्या आदेशानुसार कर्मचाऱ्यांना रोटेशननुसार काम करावे लागेल, तसेच उर्वरीत कर्मचारी घरून काम करणार. गरज भासल्यास त्यांना कार्यालयात बोलवण्यात येईल. लॉकडाऊनच्या काळात सर्व अधिकारी आणि कर्मचारी मुख्य कार्यालयातच राहतील. ते कार्यालय सोडून जाऊ शकणार नाहीत.
ही व्यवस्था २० एप्रिलपासून ते ३ मेपर्यंत असेल. या दरम्यान, कर्मचाऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या निर्देशानुसार सोशल डिस्टंसिंग पाळावे लागणार, तसेच मास्कचा वापर अनिवार्य असेल. यासंबंधित आदेश प्रत्येक कार्यालयाला दिले जातील.
दुसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊन लागू केल्यानंतर केंद्र सरकारने नवीन गाईडलाइन्स जाहीर केल्या आहेत. त्यानुसार राज्य सरकारनेही नियमावली घोषित केली आहे. यानुसार उद्योग, कारखाने आणि लहान दुकानदारांना लॉकडाऊनच्या बाहेर ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.