नवी दिल्ली - कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग पाहता देशाचे आरोग्य मंत्रालय विशेष खबरदारी घेत आहे. याचाच एक भाग म्हणून, मंत्रालयाने १५ एप्रिलपर्यंत सर्व पर्यटक व्हिसा रद्द केले आहेत. दरम्यान मुत्सद्दी, अधिकृत, यूएन / आंतरराष्ट्रीय संस्था, रोजगार आणि प्रकल्प व्हिसा मात्र रद्द करण्यात आले नाहीत. १३ मार्चपासून हा निर्णय लागू होणार आहे.
यासोबतच १५ फेब्रुवारीनंतर चीन, इटली, इराण, दक्षिण कोरिया, फ्रान्स, स्पेन आणि जर्मनी या देशांमधून आलेल्या सर्व नागरिकांना १४ दिवसांसाठी इतरांपासून वेगळे ठेवण्यात येणार आहे. यामध्ये परदेशी नागरिकांसोबतच भारतीयांचाही समावेश असणार आहे, असेही मंत्रालयाने स्पष्ट केले.
तसेच, ओसीआय कार्डधारकांना देण्यात आलेली व्हिसा-फ्री प्रवासाची मुभा ही १५ एप्रिलपर्यंत अबाधित ठेवण्यात आली आहे.
दरम्यान, भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, आज महाराष्ट्रात काही नवीन रुग्ण आढळून आले. त्यामुळे देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या ६३हून अधिक झाली आहे. या सर्वांची प्रकृती स्थिर असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
हेही वाचा : COVID-19 : विद्यार्थ्यांचे स्वॅब नमुने घेण्यासाठी डॉक्टरांचे पथक जाणार इटलीला..