नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज (शनिवार) गुजरात राज्यात दोन किमीपेक्षा मोठ्या रोपवेचे उद्धाटन केले. राज्यात पर्यटकांची संख्या वाढण्याबरोबरच रोपवेमुळे स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असे मोदी म्हणाले. व्हर्च्युल कार्यक्रमात मोदींनी रोपवेसह इतर दोन प्रकल्पांचेही उद्धाटन केले.
रोपवेमुळे गिरनार डोंगर पाहता येणार
'देवी अंबा गिरनारच्या जंगलात राहते. गिरनार डोंगररांगेत गोरखनाथ, गुरु दत्तात्रय शिखरांसह जैन मंदिरही आहे. येथील शिखरांवर पायऱ्याद्वारे चढून येणाऱ्या व्यक्तीला शक्ती आणि शांततेची अनुभूती येते. आता जागतिक दर्जाचा रोपवे तयार झाल्याने प्रत्येकाला डोंगर पाहण्याची संधी मिळेल. गिरनार रोपवे सुरू झाल्याने लोकांच्या सुविधेत वाढ होईल तसेच स्थानिकांना रोजगाराच्या संधीही उपलब्ध होतील, असे मोदी म्हणाले.
२५ ते ३० केबिन
गिरनार रोपवेमध्ये २५ ते ३० केबिन असणार आहेत. या प्रत्येक केबिनमध्ये ८ व्यक्ती बसू शकतात. या रोपवेमुळे २ किमी ३०० मीटरचे अंतर अवघ्या साडेसात मिनिटांत पार करता येणार आहे. या रोपवेमध्ये बसून पर्यटकांना गिरणार पर्वत पाहता येणार आहे. गिरनार रोपवे हा मोदींच्या ड्रीम प्रोजेक्टमधील एक होता. राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या देखरेखीखाली याचे कार्य करण्यात आले.
गुजरातमध्ये पर्यटकांची वाढ
राज्यातील पर्यटकांची संख्या वाढल्याचेही मोदींनी यावेळी सांगितले. कोरोना महामारी सुरू होण्याआधी ४५ लाख नागरिकांना "स्टॅच्यू ऑफ युनिटी"ला भेट दिली. आता पुन्हा हे पर्यटनस्थळ सुरू झाल्याने पर्यटकांची संख्या वाढत आहे, असे मोदी म्हणाले. नुकतेच राज्यातील शिवाजीपुरम बीच आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळखला जाऊ लागला आहे. या किनाऱ्याला 'ब्लू फ्लॅग' सर्टिफिकेट मिळाले आहे. अशा ठिकाणांचा विकास केल्याने राज्यातील पर्यटक मोठ्या संख्येने वाढतील, असे मोदी म्हणाले.