पाटणा - आगामी लोकसभा निवडणुकांसाठी सर्वच पक्षांनी जय्यत तयारी केली आहे. मात्र, भाजपा पेच एका जागी फसलेला दिसतो. बिहारच्या बेगुसराय येथून ज्या नेत्याला भाजपे उमेदवारी दिली तो नेताच येथून लढण्यास तयार नाही. याबद्दल त्या नेत्याने पक्षाकडे आपली नाराजगीही जाहीर केली आहे.
भाजपचे कट्टर नेते आणि केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह, असे त्यांचे नाव आहे. शनिवारी बिहार येथे भाजप आणि एनडीए पक्षांनी उमेदवारांची यादी जाहीर केली. तेंव्हा पासून ते आपल्या मतदार संघात फिरणे सोडून दिल्लीच्या केंद्रीय कार्यालयात ठिय्या मारून बसले आहेत. खरे तर भाजपने त्यांना बेगुसराय या मतदार संघातून उमेदवारी दिली आहे. मात्र, त्यांची इच्छा नवादा येथून निवडणूक लढण्याची होती.
बिहार येथे भाजपने नितीश कुमारांच्या जनता दल युनाईटेड आणि रामविलास पासवानच्या लोकजन शक्ती पक्षाशी आघाडी केली आहे. नवादाची जागा ही भाजपला न मिळता रामविलास पासवानच्या पक्षाला गेलेली आहे. त्यामुळे गिरिराज सिंह यांना बेगुसराय येथून उमेदवारी मिळाली आहे.
गिरिराज सिंह २०१४मध्ये बेगुसराय येथून निवडणूक लढवणार होते. त्यावेळी त्यांना नवादा येथून उमेदवारी देण्यात आली होती. यावेळी त्यांना नवादा येथून लढायचे होते तर त्यांना बेगुसराय देण्यात आले.
या मतदार संघातून भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते आणि जवाहरलाल नेहरु विद्यापीठाच्या विद्यार्थी संघाचे माजी अध्यक्ष कन्हैया कुमार निवडणूक लढवत आहेत. रविवारीच भाकपने त्यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा केली. मात्र, मागच्या अनेक दिवसांपासून ते बेगुसराय येथून लढणार हे स्पष्ट होते. गरिराज सिंह यांनाच भिऊन या मतदार संघातून निवडणूक लढण्यास तयार नाहीत, सध्या अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे.