मनामा - बहरीन देशाची राजधानी मनामामधील कृष्णा टेम्पल दरवर्षी पारंपारिक पद्धतीने गणेशाची स्थापना केली जाते. महाराष्ट्र सांस्कृतिक मंडळातर्फे गेली ३५ वर्षे येथे अगदी उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जातो. यावर्षीही गजानन विश्वनाथ खोलगडे यांच्या अध्यक्षतेखाली कृष्णा टेम्पलमध्ये गणेशोत्सव साजरा करण्यात आला.
गेल्याच महिन्यात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी बहरीन दौऱ्यावर होते, तेव्हा त्यांनी कृष्णा टेम्पलमधील या हॉलला भेट दिली होती. याच हॉलमध्ये हा गणेशोत्सव साजरा करण्यात आला. दरवर्षी महाराष्ट्र सांस्कृतिक मंडळामार्फत इथे वेगवेगळे देखावे करण्यात येतात. यावर्षी दुबईच्या अबुधाबीमध्ये तयार होत असलेल्या हिंदू मंदिराचा देखावा तयार करण्यात आला होता. दुर्गेश तटकर आणि इतर गणेश भक्तांनी मिळून हा देखावा तयार केला आहे.
बहरीनमधील नागरिक, तसेच बहरीन आणि सौदीमध्ये असलेले सर्व भारतीय या गणेशाच्या दर्शनासाठी एकत्र येतात. यामध्ये सर्व धर्मांचे लोक सहभागी असतात. सर्व एकत्र येऊन भक्तीभावाने गणेशाची आराधना करतात, अशी माहिती महाराष्ट्र सांस्कृतिक मंडळ, बहरीनच्या सांस्कृतिक सचिव सोनाली शिंदे यांनी दिली.
हेही वाचा : खैरताबादमध्ये तब्बल '६१ फुटी' गणेश मूर्तीचे विसर्जन; पहा व्हिडिओ