गांधीनगर - पुढच्या जन्मी आपण एका हरिजन घरातील मुलगी म्हणून जन्माला यावे, अशी महात्मा गांधींची इच्छा होती. जेणेकरून, हरिजनांना जसे उच्चवर्णीय हिंदूंकडून होणाऱ्या अन्याय, क्रोध आणि शोषणाला सहन करावे लागते, तशा वागणुकीच्या अनुभवाला तेही सामोरे जातील. त्यांची ही इच्छा पूर्ण झाली, तर त्यांच्या लक्षात येईल, की त्यांच्या स्वतःच्या राज्यात- गुजरातमध्येच दलितांची आजची अवस्था मागच्या शतकापेक्षाही वाईट आहे.
गेल्या २३ वर्षांमध्ये, राज्यात दलित समाजाच्या ५२४ लोकांची उच्चजातीय हिंदूंकडून हत्या करण्यात आली आहे. याच काळात १,१३३ दलित महिलांवरती अत्याचाराच्या घटना झाल्या आहेत, आणि २,१०० दलित हे गंभीर जखमी झाले आहेत. उच्चवर्णीय लोकांकडून दलितांवर करण्यात आलेल्या अत्याचारांच्या एकूण ३८,६०० तक्रारी या काळात दाखल झाल्या आहेत. गांधीजींची हरिजन घरात मुलगी म्हणून जन्माला येण्याची इच्छा आपण समजू शकतो. आपल्या लहानपणापासूनच गांधीजींनी हिंदू समाजातील अस्पृश्यतेला विरोध केला आहे. त्यांनी आपल्या आईच्या, सफाई कामगारांना हात न लावण्याच्या कठोर ताकीदीलाही नकार दिला होता. त्यांचे कुटुंबही कर्मठ होते आणि इतर हिंदू वैष्णव कुटुंबांप्रमाणे अस्पृश्यता पाळत. मात्र, गांधीजींनी आयुष्यभर त्याचा विरोधच केला.
हेही वाचा : गांधींना अपेक्षित शिक्षणव्यवस्था आणि आजची शिक्षणव्यवस्था
हिंदू धर्माला लागलेला कलंक म्हणून गांधीजी अस्पृश्यतेकडे पाहत. त्यांनी संस्कृत शास्त्राच्या पंडितांना वेद आणि पुराणांमध्ये अस्पृश्यता दाखवण्याचे आव्हान देखील दिले होते. एखाद्या वेदात किंवा पुराणात जर अस्पृश्यतेचा पुरस्कार केला जात असेल, तर नक्कीच त्या वेदांना मी नाकारेल, असे ते म्हणत.
गांधींजींचे असे मत होते की; उच्चवर्णीयांनी स्वच्छतागृहांमध्ये काम करणे आणि मेलेल्या गायींची विल्हेवाट लावणे अशी कामे स्वतः करुन, त्यांच्या आणि त्यांच्या पूर्वजांच्या पापांबद्दल प्रायश्चित्त केले पाहिजे. अस्पृश्यता नष्ट व्हावी यासाठी गांधीजी आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन देत. ते केवळ अशा लग्नसमारंभांना हजेरी लावत जिथे नवदांपत्यांपैकी एक उच्चवर्णीय आणि एक हरिजन असेल.
त्यांच्या नियतकालिकांपैकी, इंग्रजी नियतकालिकाला 'हरिजन, हिंदीला हरिजन बंधू, आणि गुजरातीला हरिजन सेवक अशी नावे दिली होती. हरिजनचे संपादक म्हणून काम पाहत असताना, गांधीजींचे सचिव महादेव देसाई हे रात्री स्वयंसेवकांना घेऊन जवळच्या खेड्यांमध्ये स्वच्छता करण्यास जात.
त्यांच्यानंतर गांधींचे सचिव असलेले प्यारेलाल हे महादेव यांच्याबद्दल लिहितात : ज्यांनी त्यांना (महादेवभाईंना) कामाच्या प्रचंड दबावाखाली असताना देखील, हे काम करताना पाहिले आहे, त्यांना त्यांची हरिजनांप्रती असलेली तळमळ सहज लक्षात येईल. या कामामुळेच त्यांना गांधीजींचे विचार स्पष्ट आणि रोखठोकपणे आपल्या लेखनीतून उतरवता आले. शिवाय, त्यांना काम करताना पाहून, हजारो स्वयंसेवकांना प्रेरणा देखील मिळाली.
हरिजनांना हिंदू मंदिरांमध्ये मोफत प्रवेश मिळावा म्हणून केलेल्या आंदोलनामध्ये गांधीजींना तुरुंगवास भोगावा लागला. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर, गांधीजींनी १९३३-३४च्या दरम्यान देशभर हरिजन यात्रा घेतल्या. त्यांच्या या यात्रांना सर्वप्रथम जमनलाल बजाज या उद्योगपतीने प्रतिसाद दिला. त्यांनी वर्ध्यातील एका मंदिराचे दरवाजे हरिजनांसाठी खुले केले. गांधीजींच्या केरळ यात्रेमुळे त्रावणकोर राज्याच्या महाराजांनी दलितांना मंदिरांमध्ये मोफत प्रवेश देण्याचा आदेश दिला. याआधी गांधीजींनी, मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यांवर दलितांना केलेल्या बंदीच्या विरोधात, केरळ आणि वैकोम येथील सत्याग्रहाच्या चळवळींना आपले समर्थन दिले होते.
हेही वाचा : आजची बेरोजगारी आणि गांधीवादी अर्थशास्त्राची गरज
महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये बरेच मतभेद होते. मात्र, तरीही गांधीजींनी आंबेडकरांना मंत्रिमंडळात घेण्यासाठी नेहरूंना आग्रह केला होता. यावेळी, आंबेडकरांनी नेहमीच काँग्रेसला विरोध केला आहे, मी त्यांना मंत्रिपद कसे देऊ शकतो? असा सवाल नेहरूंनी केला. त्यावर, तुम्हाला काँग्रेसचे मंत्रिमंडळ बनवायचे आहे, की देशाचे? असा प्रतिप्रश्न गांधींनी नेहरूंना केला होता. त्यानंतर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा केंद्रीय कायदेमंत्री म्हणून नेहरूंच्या पहिल्या मंत्रिमंडळात समावेश झाला.
गांधीजींनीच डॉ. आंबेडकर यांना घटनेच्या रचनेबाबत सरकारला सल्ला देण्यासाठी असलेल्या समितीचे सदस्य बनवण्याचा आग्रह धरला होता. नंतर डॉ. आंबेडकर यांनी भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून काम केले.
गांधीजी आणि डॉ. आंबेडकर यांच्यामधील मतभेदांचे मूळ हे अस्पृश्यतेला नष्ट करण्याच्या त्यांच्या वेगवेगळ्या पद्धतीमध्ये होते. डॉ. आंबेडकर यांच्या मते हरिजनांना न्याय मिळावा यासाठी संविधानामध्ये काही तरतूद करणे हाच एक उपाय होता. तर गांधीजींच्या मते, लोकांच्या समर्थनाशिवाय, पाठिंब्याशिवाय केवळ कायद्याच्या मदतीने हा प्रश्न सुटू शकणार नाही. त्यामुळे त्यासाठी, अस्पृश्यतेच्या विरोधात जनजागृती करणे आवश्यक आहे.
आज दलितांप्रती भेदभाव, अस्पृश्यता, जातीयवाद हे पाळणे कायद्याने गुन्हा आहे. मात्र, तरीही त्यांच्यावरील अन्याय आणि त्यांच्या शोषणाच्या घटना या घडतच आहेत.
हेही वाचा : महात्मा गांधी : एक व्यावहारिक आदर्शवादी