नवी दिल्ली - प्रकृती खालावल्याने माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना रविवारी (१० मे) एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर त्यांना आज (मंगळवारी) घरी सोडण्यात आले आहे. ताप, छातीत दुखत असल्याने आणि श्वसनास त्रास होत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
कोरोना चाचणीही करण्यात आली
ताप आणि श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना कोरोना झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत होता. तसेच छातीत दुखत असल्याने त्यांना हृदयविकार विभागात दाखल करण्यात आले होते. त्यांची कोरोना चाचणीही घेण्यात आली होती. मात्र, कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. तर इतर चाचण्यांचे निकालही सर्वसामान्य आले. त्यानंतर सिंग यांना सर्वसामान्य वार्डात हलविण्यात आले होते. आज त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
नव्या औषधांमुळे ताप आला होता
सिंग यांना नव्याने देण्यात येणाऱ्या औषधांमुळे ताप येण्यास सुरुवात झाली होती. त्यामुळे रुग्णालयातही त्यांनी निगराणीखाली ठेवण्यात आले होते.