फतेहाबाद - संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये नागरिकत्व कायदा सुधारणा विधेयक मंजूर झाल्यानंतर विविध ठिकाणच्या नागरिकांमधून वेगवेगळ्या भावना व्यक्त होत आहेत. पाकिस्तानातून भारतात आलेल्या हिंदू परिवारांनी आनंद व्यक्त केला आहे. या सर्वांना आता भारतीय नागरिकत्व मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या पार्श्वभूमीवर हरियाणातील फतेहाबाद येथील रतिया परिसरात राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांनी मिठाई वाटून आनंद साजरा केला. तसेच, सरकारचे आभारही मानले. यापैकी दिव्य राम यांनी ईटीव्ही भारतशी संवाद साधत पाकिस्तानच्या जुलुमांचे वास्तव सांगितले. विशेष म्हणजे काही काळापूर्वी आपण स्वतः पाकिस्तानच्या संसदेचे सदस्य होतो, अशी माहितीही त्यांनी दिली.
बेनझीर भुट्टो यांच्या कार्यकाळात राखीव जागेवरून पाकिस्तानी संसदेचे सदस्य बनले होते दिव्य राम
दिव्य राम बेनझीर भुट्टो यांच्या कार्यकाळात राखीव जागेवरून पाकिस्तानी संसदेचे सदस्य बनले होते. ते ९० दिवस संसदेचे सदस्य राहिले. मात्र, ते मुस्लीम नसल्यामुळे त्यांचा छळ करण्यात येऊ लागला. त्यांच्या एका मुलीला जबरदस्तीने उचलून नेण्यात आले. त्यांच्यावर मुस्लीम धर्म स्वीकारण्यासाठी दबाव आणण्यात येऊ लागला. यानंतर त्रास असह्य झाल्याने नाईलाजाने त्यांनी संसदेचे सदस्यत्व सोडले. आता ते मागील १९ वर्षांपासून भारतात राहात आहेत.
पाकिस्तानी सर्वोच्च न्यायालयानेही मुस्लीम धर्म स्वीकारण्यास सांगितले
दिव्य राम आणि त्यांच्या कुटुंबीयांचा मुस्लीम धर्म स्वीकारण्यासाठी छळ करण्यात येऊ लागला. याविरोधात त्यांनी पाकिस्तानी न्यायालयात धाव घेतली. त्यांचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेले. मात्र, पाकिस्तानी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनीही दिव्य राम यांना चक्क मुस्लीम धर्म स्वीकारण्याचाच सल्ला दिला. यानंतर नाईलाजाने त्यांनी संसदेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आणि ते भारतात निघून आले. मागील १९ वर्षांपासून ते भारतात राहात आहेत.
पाकिस्तानच्या त्रासाला कंटाळून भारतात आलो, आता पुन्हा तेथे जाणार नाही
दिव्य राम यांनी पाकिस्तानच्या त्रासाला कंटाळून जानेवारी २००० मध्ये व्हिसावर भारतात आल्याचे सांगितले. सुरुवातीला ते रोहतक जिल्ह्यातील कलानौर आणि रोहतक शहरात राहिले. व्हिसा संपल्यानंतर त्यांनी रोहतकच्या तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांच्या समक्ष हजर होत आपली व्यथा मांडली. आपण आणि आपले कुटुंब कोणत्याही परिस्थितीत मुळीच पाकिस्तानात जाणार नाही, असे त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले. त्यांनी आपल्याला भारतातच राहू देण्याची विनंती केली. याशिवाय, त्यांना बजरंद दल आणि काही हिंदू संघटनांनीही मदत केली. अखेर येथील उपायुक्तांनी त्यांना तेथे राहण्याची परवानगी दिली. नंतर ते २००६ मध्ये रोहतकहून फतेहाबादच्या जवळच्या रतिया कस्बाजवळील रतनगढ या गावात येऊन राहू लागले. मागील १३ वर्षांपासून ते येथेच राहात आहेत. सध्या ते हिवाळ्याच्या दिवसात शेंगदाणे आणि उन्हाळ्यात कुल्फीची विक्री करून त्यांचे कुटुंब चालवत आहेत.
नागरिकत्व कायदा संशोधन विधेयक मंजूर झाल्यानंतर आनंदाची लहर
इतके सर्व घडून गेल्यानंतर इतक्या वर्षांनी संसदेत नागरिकत्व कायदा संशोधन विधेयक पारित झाल्यामुळे दिव्य राम खूप खूश आहेत आणि आनंद साजरा करत आहेत. आता त्यांना स्वतःला आणि त्यांच्या कुटुंबीयांना भारताचे नागरिकत्व मिळेल अशी आशा निर्माण झाली आहे. त्यांनी इतर सहकाऱ्यांसोबत याचा आनंद साजरा करताना चक्क त्यांचे पाकिस्तानी दस्तावेज जाळून टाकले आहेत. आपला नवा जन्म झाला आहे, असे त्यांनी म्हटले आहे.