पाटणा - महान गणित तज्ज्ञ डॉ. वशिष्ठ नारायण सिंह यांचे आज (गुरुवारी) दिर्घ आजाराने निधन झाले. प्रकृती ढासळल्याने त्यांना पाटणामधील पीएचएमसी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मेंदुमृत झाल्याने सिंह यांचे निधन झाल्याचे त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले. डॉ. वशिष्ठ नारायण सिंह यांचा जन्म बिहारमध्ये झाला होता.
डॉ. विशिष्ठ नारयण सिंह यांनी आईन्स्टाईनच्या (E = mc२) या सिद्धांताला आव्हान दिले होते. गणितात जिनियस असणाऱ्या आईन्स्टाईन यांच्या सिद्धांताला आव्हान दिल्यामुळे त्याची बरीच चर्चा झाली होती. अपोलो मिशन वेळी डॉ. विशिष्ठ अमेरिकेची अवकाश संस्था नासामध्ये कामाला होते. त्यावेळी अचानक संगणकामध्ये बिघाड झाल्याने त्यांनी बोटांनीच मोजायला सुरुवात केली होती. त्याचे उत्तर बरोबर असल्याचे सांगितले जाते.
डॉ. वशिष्ठ नारायण सिंह यांचा प्रवास
- वशिष्ठ नारायण सिंह यांचा जन्म २ एप्रिल १९४२ साली बिहारमधील भोजपूर जिल्ह्यातील बसंतपूर या गावी झाला.
- नेतरहाट विद्यालयात त्यांनी प्राथमिक शिक्षण घेतले.
- १९६२ मध्ये त्यांनी मॅट्रिकची परिक्षा उत्तीर्ण केली. मॅट्रिक आणि इंटरमीजिएट या दोन्ही परिक्षेमध्ये त्यांनी बिहारमध्ये प्रथम क्रमांक पटकावला.
- १९६५ साली कॅलिफोर्निया येथील बर्कले विद्यापीठात ते संशोधन करण्यासाठी गेले.
- १९६९ साली त्यांनी कॅलिफोर्निया विद्यापिठातून पीएचडी पदवी मिळवली. त्यानंतर वॉशिंग्टन विश्वविद्यालयात सहायक प्राध्यापक म्हणून काम केले.
- चक्रिय सदिश समष्टी सिद्धांतावरील त्यांचे संशोधन भारतासह जगामध्ये प्रसिद्ध झाले.
- डॉ. वशिष्ठ यांनी नासामध्ये वैज्ञानिक पदावर काम केले.
- त्यानंतर डॉ. वशिष्ठ भारातामध्ये आले. भारतात आल्यावर त्यांनी आयआयटी कानपूरमध्ये प्राध्यापक म्हणून नोकरी केली.