नवी दिल्ली - पंतप्रधान मोदींचे हेलिकॉप्टर तपासणाऱ्या आयएएस अधिकाऱ्याचे निलंबन दुर्दैवी आहे, असे मत माजी निवडणूक आयुक्त शाहबुद्दीन याकूब कुरैशी यांनी व्यक्त केले आहे. निवडणूक आयोग आणि पंतप्रधानांकडे स्वत:ची प्रतिमा सुधारण्याची ही एक संधी होती. मात्र, त्यांनी ती गमावली असल्याचे कुरैशी म्हणाले.
पंतप्रधान मोदी सतत आदर्श आचारसंहितेचा भंग करत आहेत आणि निवडणूक आयोग त्याकडे कानाडोळा करत आहे. पंतप्रधानांच्या हेलिकॉप्टरची तपासणी ही एक संधी होती. ज्यातून हे दाखवून देता आले असते की, कायदा सर्वांसाठी समान आहे. एकाच झटक्यात दोघांवरही (पंतप्रधान, निवडणूक आयोग) होणारी टीका थांबली असती. त्यांच्यावर होणाऱ्या टीकेत आता वाढ होईल, असेही कुरैशी म्हणाले.
'मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्या चॉपरची त्यांच्या डोळ्यांसमोरच तपासणी करण्यात आली. ज्यामुळे पटनायक यांची किंमत वाढली. आपल्याला अशाच नेत्यांची गरज आहे. मिस्टर पटनायक यांना सलाम', असे कुरैशी यांनी टि्वटमध्ये म्हटले होते.
पंतप्रधान मोदींच्या हेलिकॉप्टरची तपासणी करणारा आयएएस अधिकारी निलंबित -
पंतप्रधान मोदी प्रचार सभेसाठी संबळला आल्यानंतर त्यांचे हेलिकॉप्टर तपासण्यात आले. निवडणूक आयोगाने या प्रकरणाच्या चौकशीसाठी एका व्यक्तीचे पथक ओडिशाला पाठविले होते. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार मोहम्मद मोहसीन या कर्नाटक केडरच्या आयएएस अधिकाऱ्याची विशेष निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्याने योग्य प्रकारे निवडणूक आयोगाच्या सूचनांचे पालन केले नाही. पंतप्रधानांसारख्या विशेष संरक्षण दलाकडून संरक्षण देण्यात आलेल्या व्यक्तीबाबत ही अपवादात्मक कारवाई करण्यात आली. या कारवाईविषयी पंतप्रधान मोदींकडून तक्रार करण्यात आल्यानंतर निवडणूक आयोगाद्वारे या निवडणूक अधिकाऱ्याविरोधात कारवाई करण्यात आली. या अधिकाऱ्याला २२ मार्चला विशेष संरक्षण दलाकडून संरक्षित करण्यात आलेल्या व्यक्तींवर कारवाई न करण्याच्या तसेच, त्यांना तपासणीतून मुक्तता देण्याविषयी सूचना देण्यात आल्या होत्या, असे आयोगाने म्हटले आहे.