रांची : बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांच्या जामीन अर्जावर शुक्रवारी सुनावणी होणार आहे. ९५० कोटींच्या चारा घोटाळा प्रकरणी झारखंडच्या उच्च न्यायालयात ही सुनावणी पार पडेल. याप्रकरणी २८ ऑगस्टलाच सुनावणी होणार होती. मात्र, सीबीआयचे असिस्टंट सॉलिसिटर जनरल राजीव सिन्हा यांची तब्येत ठीक नसल्यामुळे ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली होती.
यापूर्वी प्रसाद यांचे वकील देवर्षी मंडल यांनी असा युक्तीवाद मांडला होता, की एकूण शिक्षेपैकी अर्धा काळ लालूंनी तुरुंगात व्यतित केला आहे. त्यामुळे त्यांच्या जामीन अर्जाला मंजूरी देण्यास कोणतीही अडचण नसावी. तसेच, त्यांच्या खालावत चाललेली प्रकृतीकडे पाहून उच्च न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज मंजूर करावा, अशी मागणीही मंडल यांनी केली होती.
लालूप्रसाद यादव यांच्यावर सध्या राजेंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये उपचार सुरू आहेत. आतापर्यंत लालू प्रसाद यांच्यावरील तीन चारा घोटाळे सिद्ध झाले आहेत. ते डिसेंबर २०१७ पासून रांचीच्या बिरसा मुंडा तुरुंगात बंद आहेत.
हेही वाचा : भारत-चीन सीमातणाव : सैनिक मागे हटवण्यावर दोन्ही परराष्ट्र मंत्र्यांचे एकमत