नवी दिल्ली : पुढील आठवड्यामध्ये देशात कोरोना लसीकरणाला सुरुवात होऊ शकते, असे संकेत आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी दिले आहेत. ते आरोग्य मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. सामान्य नागरिकांना या लसीकरणासाठी नावनोंदणी करावी लागणार आहे. मात्र, वैद्यकीय कर्मचारी आणि अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्यांना अशी नोंदणी करावी लागणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
पुढील आठवड्यात येणार लस?
लसीला आपत्कालीन वापरासाठी परवानगी मिळाल्यानंतर दहा दिवसांमध्येच लसीकरण सुरू करण्याची आमची तयारी आहे, असे राजेश यांनी सांगितले. लसीला सध्या अत्यावश्यक आणि मर्यादित वापरासाठी परवानगी मिळाली आहे. त्यामुळे पुढील निर्णय केंद्र सरकारच घेईल असेही त्यांनी स्पष्ट केले. डीसीजीआयने तीन जानेवारीला कोव्हॅक्सीन आणि कोव्हिशील्ड या दोन लसींच्या आपत्कालीन वापराला परवानगी दिली होती.
देशात सुमारे ४० लस-साठवण केंद्रे..
देशात सध्या कोरोना लस साठवून ठेवण्यासाठी चार प्रमुख केंद्रे आहेत. या केंद्रांना जीएमएसडी म्हटले जाते. कर्नाळ, मुंबई, चेन्नई आणि कोलकातामध्ये ही केंद्रे आहेत. यासोबतच देशभरात अशी ३७ लहान केंद्रे असल्याचेही राजेश यांनी सांगितले. लसींना विशिष्ट तापमानात ठेवावे लागते. अशा प्रकारची केंद्रे आपल्याकडे गेल्या दशकभरापासून असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अॅक्टिव रुग्णसंख्या अडीच लाखांहून कमी..
देशातील अॅक्टिव कोरोना रुग्णांची संख्या अडीच लाखांहून कमी आहे, आणि दररोज यामध्ये घट होत आहे. तसेच, सध्या पॉझिटिव्हीटी दरही १.९७ टक्क्यांवर आला असल्याचे राजेश यांनी सांगितले.
एकूण अॅक्टिव रुग्णसंख्येच्या ४४ टक्के रुग्णांना मध्यम किंवा जास्त प्रमाणात लक्षणे दिसून येत आहेत. हे रुग्ण रुग्णालयांमध्ये आहेत. तर ५६ टक्के रुग्णांना अतीशय कमी किंवा काहीच लक्षणे दिसून येत नाहीत, त्यामुळे त्यांच्यावर घरातच उपचार सुरू आहेत अशी माहिती भूषण यांनी दिली.
हेही वाचा : कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचे आणखी २० रुग्ण आढळले; देशभरात एकूण ५८ जणांना लागण