नवी दिल्ली - पंजाबमधील जालंधर आणि मोगा येथे शनिवारी लागलेल्या आगीत सुमारे १७०० एकर गव्हाचे उभे पीक जळून खाक झाले. १७०० पैकी १५०० एकर जालंधरमध्ये २०० एकरचे पीक मोगा जिल्ह्यात जळून खाक झाले. काही ठिकाणी गव्हाची कापणी सुरू झाली होती. गव्हाचे पीक हाताशी आले असताना ते आगीत भस्मसात झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.
प्रत्येक वर्षी अशा प्रकारच्या घटना घडतात. हजारो एकर गहू जळून खाक होतो. पंजाब देशातील सर्वाधिक गहू पिकवणारा देश आहे. त्यामुळे १७०० एकरमधील पीक आगीत जळून खाक होणे ही मोठी घटना आहे. एक-दोन दिवसांत पिकाची कापणी होणार होती. मात्र, आग लागल्याने लाखोंचे नुकसान झाले आहे. पंजाबला लागून असलेल्या हरियाणामध्येही अनेक जिल्ह्यांत शेतांमध्ये आगी लागून पीक जळून गेले आहे. करनाल जिल्ह्यातील अनेक गावांमध्येही हीच परिस्थिती आहे.
गव्हाला आग लागल्यानंतर शेतकऱ्यांकडून ती विझवण्याचे प्रयत्न करण्यात आले. काही ठिकाणी आग पसरू नये म्हणून आगीच्या बाजूचे पीक कापण्याचे प्रयत्नही करण्यात आले तसेच, ट्रॅक्टरमधून पाणी मारणाऱ्याचाही प्रयत्न झाला. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रयत्न केले मात्र, ते अपयशी ठरले. आगीचे कारण आणि अशा प्रकारच्या आगी लागू नयेत, म्हणून प्रशासनाने कोणती खबरदारी घेतली आहे, याविषयी प्रश्नचिन्ह आहे. प्रशासनाकडून याविषयी कोणतेही निवेदन जारी करण्यात आलेले नाही.