नवी दिल्ली - दिल्ली पश्चिममधील मुंडका परिसरात शनिवारी पहाटे एका गोदामाला मोठी आग लागली. आगीने भीषण रूप धारण केले असून सध्या अग्निशामक दलाच्या 21 गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून आग विझवण्याचे कार्य युद्धपातळीवर सुरू आहे.
सकाळी साडेपाच वाजता मेट्रो स्टेशनजवळी प्लायवूडच्या गोदामाला ही आग लागल्याची माहिती मिळाली आहे. या आगीने इतके रौद्र रूप धारण केले होते की समोरच्या बल्बच्या कारखान्यापर्यंत ही आग पोहोचली होती. सुदैवाने यामध्ये जीवितहानी झालेली नाही.
पहाटे मुंडका परिसरात आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर अग्निशामक दलाच्या 12 गाड्या तातडीने घटनास्थळी पोहोचल्या. मात्र, आगीची तीव्रता लक्षात घेऊन आणखी गाड्यांना पाचारण करण्यात आले. सध्या या ठिकाणी 21 गाड्यांच्या सहाय्याने आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आगीचे कारण अद्याप समजलेले नाही.
एका आठवड्यापूर्वीच दिल्लीतील जुनी अनाज मंडी येथील एका अनधिकृत कारखान्याला आग लागली होती. यात तब्बल ४३ लोकांना होरपळून जीव गमवावा लागला होता. तर, ६२ जण जखमी झाले होते. यानंतर आठवड्याभरात ही दुसरी मोठी आग आहे.