हरिद्वार - सीपीएमचे महासचिव सीताराम येचुरी यांच्याविरोधात हरिद्वार येथे तक्रार दाखल झाली आहे. त्यांनी रामायण आणि महाभारत या महाकाव्यांवर 'ही हिंसा आणि युद्धांच्या उदाहरणांनी भरलेली असल्याची' टीका केली होती. यानंतर योग गुरु रामदेव बाबा आणि इतर काही जणांनी येचुरींविरोधात तक्रार दाखल केली आहे.
'आमच्या पूर्वजांचा अपमान केल्याबद्दल येचुरी यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. हा गुन्हा आहे. त्यांना गजाआड केले पाहिजे. आम्ही याविरोधात कडक चौकशीची मागणी केली आहे,' असे रामदेव बाबा यांनी म्हटले आहे.
गुरुवारी येचुरी यांनी भाजपवर हल्ला चढवताना समाजामध्ये मतांसाठी फूट पाडली जात असल्याचा आरोप केला. तसेच, रामायण आणि महाभारत ही धार्मिक महाकाव्ये हिंदूंच्या हिंसेचा नमुना म्हणून प्रसिद्ध आहेत, असे ते म्हणाले होते. 'साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर म्हणतात हिंदूंचा हिंसेवर विश्वास नाही. अनेक राजे-रजवाड्यांनी देशात युद्धे लढली. रामायण आणि महाभारत हीदेखील हिंसेच्या घटनांनी भरलेली आहेत,' असे ते म्हणाले.
'तुम्ही प्रचारक असताना या महाकाव्यांचे वर्णन करता. तरीही, हिंदू हिंसक नसल्याचा दावा कसा करता? धर्मामध्ये हिंसा असताना आम्ही हिंदू हिंसक नाही आहोत हे सांगण्याला काय अर्थ आहे,' असे ते म्हणाले.
यानंतर अनेक नेत्यांनी येचुरी यांच्यावर टीका केली आहे. शिवसेनेने सीपीआयच्या महासचिवांनी त्यांचे 'सीताराम' हे नाव टाकून द्यावे, असा सल्ला दिला आहे.