कोलकाता : राज्य भाजपचे प्रमुख दिलीप घोष यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधी आंदोलन करणाऱ्या लोकांना गोळ्या घालून ठार मारण्याबाबत त्यांनी केलेल्या वक्तव्यावरून ही तक्रार दाखल केली गेली आहे. उत्तर प्रदेशमध्ये ज्याप्रकारे लोकांना मारले त्याचप्रकारे येथेही मारू, अशी धमकीही त्यांनी दिली होती.
पश्चिम बंगालच्या नादिया जिल्ह्यात एका जाहीर सभेमध्ये बोलताना, घोष यांनी राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींवर जोरदार टीका केली होती. गेल्या वर्षीच्या डिसेंबरमध्ये सीएए विरोधात झालेल्या आंदोलनादरम्यान सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणाऱ्या लोकांवर गोळीबार किंवा लाठीचार्ज न केल्याबद्दल ते ममतांवर बरसले होते.
'नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधी आंदोलकांनी राज्यातील सार्वजनिक आणि खाजगी मालमत्तेचे नुकसान केले आहे. हे लोक पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची मतदार आहेत. त्यामुळे दीदी (ममता बॅनर्जी) त्यांच्याविरूद्ध कुठल्याच प्रकारची कारवाई करत नाहीत. मात्र, भाजपची सत्ता असलेल्या उत्तर प्रदेश, आसाम आणि कर्नाटक राज्यात आम्ही नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधी आंदोलकांना कुत्र्यासारखे मारले आहे', असे घोष म्हणाले होते.
तुम्ही येथे येता, राहता, खाता आणि येथील सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करता. ही तुमची जमीनदारी आहे का? असा सवाल घोष यांनी केला होता. तसेच येथील मालमत्तेचे नुकसान केल्यास आम्ही तुम्हाला मारू आणि तुरुंगात टाकू, असेही ते म्हणाले होते.
हेही वाचा : पोलिसांचा खून करणाऱ्या दोन संशयित दहशतवाद्यांना कर्नाटकमध्ये अटक