नवी दिल्ली - उत्तर प्रदेशमधील बाबा शोभन सरकार यांचे बुधवारी निधन झाले. त्यांच्या अंत्यसंस्कार वेळी लोकांनी लॉकडाऊनच्या निमयांची पायमल्ली करत गर्दी केल्याचा प्रकार नुकताच घडला. प्रतिबंधात्मक आदेशांचा आणि सामाजिक अंतर राखण्याच्या निकषांचा भंग केल्याबद्दल लोकांवर गुन्हा दाखल केला आहे.
कानपूरमधील शिवली येथील त्यांच्या आश्रमात बाबा शोभन यांचे निधन झाले. बाबांच्या निधनाची माहिती मिळताच शिवली भागातील बैरी येथील शोभन सरकार यांच्या आश्रमात लोकांनी गर्दी केली. त्यानंतर पोलीसही पोहोचले आणि त्यांनी गर्दींवर नियत्रंण मिळवण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.
आश्रमात जाण्यापासून लोकांना थांबवण्याचा आम्ही प्रयत्न केला, परंतु आमचे प्रयत्न व्यर्थ ठरले, असे पोलीस अधिकारी तिवारी यांनी सांगितले. अंत्यसंस्काराच्या वेळी एकत्र येण्यास बंदी असूनही बाबा शोभन यांच्या अंतिम संस्कारवेळी उपस्थित राहून लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे 4 हजार पेक्षा जास्त लोकांवर 3 एफआयआर नोंदविण्यात आले आहेत. दरम्यान कानपूरमध्ये आतापर्यंत कोरोनाविषाणूची 311 प्रकरणे नोंदली गेली असून त्यापैकी 111 सक्रिय प्रकरणे आहेत.
उत्तर प्रदेशातील उन्नाव येथे डोंडिया खेडा परिसरात १००० टन सोने असल्याचा दावा बाबा शोभन यांनी केला होता. त्यांच्या सांगण्यावरून मनमोहन सरकारने डोंडिया खेडा येथे ऑर्कोलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया (एएसआय) च्या पथकाद्वारे खोदकाम काम सुरू केले होते. बरेच दिवस खोदूनही तिथे सोनं सापडेले नाही.