नवी दिल्ली - भारतात लोकप्रिय असलेल्या फेसबुकच्या धोरणाबद्दल 'द वॉल स्ट्रीट जर्नल'ने धक्कादायक खुलासा केला आहे. भाजप नेत्यांची फेसबुक खाती आणि सबंधित ग्रुपवरून भारतात द्वेष आणि हिंसेला प्रोत्साहन देणारी माहिती पसरवली जात आहे. मात्र, भारतातील फेसबुकच्या व्यवसायावर विपरीत परिणाम होईल, म्हणून कंपनी नियमानुसार कारवाई करण्याचे टाळत असल्याचे अहवालात म्हटले आहे.
फेसबुकच्या नियमांचे उल्लंघन केल्यास वैयक्तिक खाते असो किंवा कोणताही ग्रुप असो, कडक कारावई करण्यात येत. पर्सनल खाते किंवा ग्रुप फेसबुक कायमचे किंवा अल्पकाळासाठी बंद ही करते. मात्र, कंपनीने भारतात नरमाईचे धोरण अवलंबल्याचा धक्कादायक आरोप या अहवालात आहे. शुक्रवारी हा अहवाल प्रसिद्ध झाला. भाजपचे नेते काही संबंधित गटांवर कारवाई करण्यास फेसबुक कंपनी कचरत असल्याचे अहवालात म्हटले आहे.
अहवालात तेलंगाणातील भाजप आमदार टी. राजा सिंह यांचा उल्लेख आहे. टी. राजा यांनी फेसबुकवर अल्पसंख्यांकांबाबत द्वेष पसरवणारी पोस्ट केली होती. मात्र, तरीही अशा मजकूरावर फेसबुककडून कारवाई करण्यात आली नाही. त्यामागे व्यावसायीक कारण असल्याचे अहवालात म्हटले आहे. भारतातील फेसबुकच्या प्रमुख अंखी दास यांनी यासंबंधी कर्मचाऱ्यांना सुचना दिल्या. जर अशा पोस्टवर कारवाई केली, तर भारतातील फेसबुकच्या व्यवसायावर परिणाम होईल, असे त्यांनी म्हटल्याचे अहवालात आहे.
फेसबुकच्या नियमानुसार सिंह यांचे खाते बंद करायला हवे होते. मात्र, तसे करण्यात आले नाही. यासोबतच इतर अनेक ग्रुप आहेत, ज्याद्वारे हिंसा आणि द्वेष पसरविण्यात येत आहेत. मात्र, फेसबुकने त्यांच्या विरोधात कारवाई न करत नरमाईची भूमिका घेतल्याचा दावा अहवालात केला आहे.
भारतात मागील काही महिन्यांपूर्वी दिल्ली आणि देशातील अनेक शहरात नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात आंदोलन झाले. यावेळी भाजप नेत्यांनी भडकाऊ भाषण केल्याचा आरोपही करण्यात आला होता. व्हॉट्सअॅप आणि इतर सोशल माध्यमांवरून अनेक व्हिडिओ आणि पोस्ट व्हायरलही झाल्या होत्या. अयोध्येतील राम मंदिर संबंधीही फेसबुकवर अनेक ग्रुपवर चर्चा सुरु आहे. त्या पार्श्वभूमीवर अहवालातून धक्कादायक माहिती समोर आली आहे.