नवी दिल्ली - कृषी कायद्यांच्याविरोधात देशभरातील शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. आज पुन्हा सरकार आणि शेतकरी यांच्यादरम्यान चर्चेची अकरावी फेरी विज्ञान भवनात पार पडली. यावेळी कायदे रद्द करण्यास सरकार तयार नसल्याची माहिती समोर येत आहे. या बैठकीतूनही काही तोडगा निघाला नसून पुढील बैठकीचीही तारीख निश्चित करण्यात आली नसल्याची माहिती आहे.
दोन वर्षासाठी कायदे स्थगित करण्यास सरकार तयार आहे. दोन वर्षासाठी कायदे स्थगित करण्याचा प्रस्ताव सरकारने शेतकऱ्यांसमोर मांडला. शेतकऱ्यांना हा प्रस्ताव मान्य असल्यास पुढील बैठक घेण्यात येणार असल्याचं मंत्र्यानी म्हटल, असे शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी सांगितले. तसेच येत्या 26 जानेवरीला ट्रॅक्टरसह दिल्लीला कूच करणार असून रॅली काढणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आम्हाला मंत्र्यांनी तब्बल तीन ते साडेतीन तास वाट पाहायला लावली. हा शेतकऱ्यांचा अपमान आहे. त्यांनी बैठकीत पुन्हा मागील बैठकीत मांडण्यात आलेल्या प्रस्तावावर चर्चा केली. कृषी कायदे दोन वर्ष स्थगित करण्याचा प्रस्तवा मांडला असून यावरच बैठकांच्या फेऱ्या संपतात, असे बैठकीत मंत्र्यांनी म्हटल्याचे शेतकरी नेते एस. एस. पंधार यांनी सांगितले. तसेच त्यांनी शेतकरी आंदोलन शांततेत सुरुच राहणार असल्याचेही सांगितले.
शेतकऱ्यांची भूमिका -
केंद्र सरकारने शेतकरी आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. मात्र, शेतकऱ्यांनी समितीच्या निष्पक्षपातीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. कृषी कायदे मागे घ्यावे, ही मागणी शेतकरी संघटनांनी केली आहे. जोपर्यंत कायदे रद्द होत नाहीत. तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिका शेतकरी संघटनांनी घेतली आहे.
येत्या प्रजासत्ताक दिनी दिल्लीत 'ट्रॅक्टर रॅली' -
संयुक्त कृषी मोर्चाच्या वतीने येणाऱ्या प्रजासत्ताक दिनी (दि. 26 जाने.) दिल्लीत ट्रॅक्टर रॅली काढण्यात येणार आहे. 40 प्रमुख शेतकरी संघटनांसह देशभरातील सुमारे 500 शेतकरी संघटनांचे हजारो शेतकरी आंदोलन करत आहेत. मात्र, आतापर्यंत त्यांच्या मागण्या केंद्र सरकारने मान्य केल्या नाहीत. त्यामुळे आता निर्णायक वेळ आली असल्याचे म्हणत शेतकऱ्यांनी हा इशारा दिला.