हमीरपूर - कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. देशातही कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. हा संसर्ग रोखण्यासाठी ३ मे पर्यंत लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. दरम्यान, याचा फटका शेतीला जास्त बसला आहे. त्यामुळे अनेक शेतकरी चिंतेत आहेत.
हमीरपूर जिल्ह्यामध्ये गहू सर्वात जास्त पिकवला जातो. सध्या गहू काढण्याचा कालावधी सुरू झाला आहे. जिल्ह्यात तब्बल ३० हजार हेक्टरवर ७६ हजार शेतकरी कुटुंब गहू पिकवतात. यावर्षी गहू चांगला आल्यामुळे उत्पन्न चांगले मिळेल अशी शेतकऱ्यांना आशा होती. मात्र, कोरोनामुळे लॉकडाऊन लागू करण्यात आला. त्यामुळे सर्वच बंद झाले. त्यामुळे ऐन गहू काढण्याच्या काळात आता मजूर मिळत नाहीत. त्यामुळे अनेक हेक्टर गहू तसाच शेतात पडून आहे.
जिल्हा प्रशासन आणि कृषी विभागाने ऑनलाईन परवानगी पास मजुरांसाठी सुरू केले आहेत. मात्र, मजूर मिळतच नसल्यामुळे गहू काढायचा कराा, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. कृषी अ्धिकाऱ्यांच्या सांगण्यानुसार, यावर्षी तब्बल ५ हजार ८०० मेट्रिक टन गहूचे उत्पादन होईल. परंतु, या लॉकडाऊनचा सर्वात जास्त फटका शेतकऱ्यांना बसत आहे.