हिसार - गेल्या दोन महिन्यापासून शांततेत चाललेल्या आंदोलनाला प्रजासत्ताक दिनी गालबोट लागले. ट्रॅक्टर रॅलीत हिंसाचार झाल्यानंतर काही आंदोलनकर्त्यांनी घराची वाट धरली होती. मात्र, भारतीय किसान युनियनचे प्रवक्ते राकेश टिकैत यांच्या भावनात्मक आवाहनानंतर शेतकरी पुन्हा सीमेवर येऊ लागले आहेत. हरयाणामधील अनेक शेतकरी पुन्हा दिल्लीकडे कूच करत आहेत.
हिसार जिल्ह्यातील नारनौंद आणि राजथल गावातील शेतकरी आंदोलनात सहभाग घेण्यासाठी सीमेवर येत आहेत. हे शेतकरी आपल्यासोबत येत्या सहा महिन्याचे रेशन घेऊन संपूर्ण तयारीने आंदोलनस्थळी परतत आहेत. केंद्र सरकारने शेतकऱ्यांना कमजोर समजण्याची चूक करू नये, असे शेतकरी म्हणाले.
राकेश टिकैत यांनी पुन्हा शेतकऱयांमध्ये जोश भरला आहे. जोपर्यंत कृषी कायदे रद्द होत नाहीत. तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार, असे शेतकरी म्हणाले. आंदोलनाला बदनाम करण्याचे पूर्ण प्रयत्न करण्यात आले. मात्र, कृषी कायदे रद्द केल्याशिवाय आम्ही परतणार नाही, असे शेतकरी म्हणाले.
आंदोलन स्थळे खाली करण्याचे आदेश -
उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांची आंदोलन स्थळे खाली करण्याचे आदेश उत्तर प्रदेश पोलिसांनी सर्व जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना आणि पोलीस अधीक्षकांना दिले आहेत. काल (गुरूवारी) रात्री गाझीपूर आंदोलनस्थळ खाली करण्याबाबत पोलिसांनी शेतकऱ्यांना 'अल्टिमेटम' दिला होता. आंदोलन मागे घेणार नाही आणि घरीही जाणार नाही. सरकारने आमच्यावर गोळ्या जरी झाडल्या, तरीही आम्ही हे आंदोलन सुरुच ठेवणार आहोत, असे भारतीय किसान युनियनचे प्रवक्ते राकेश टिकैत म्हणाले.