गांधीनगर - गुजरातचे गरबानृत्य हे जगभरात प्रसिद्ध आहे. नवरात्रोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. गुजरातच्या गरबाप्रेमींचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. याच पार्श्वभूमिवर गुजरातमध्ये पारंपरिक गरबा नृत्याव्यतिरिक्त वेगळे काहीतरी करण्यावर सर्वांचा भर आहे.
अहमदाबादच्या सुप्रसिद्ध सुफी नृत्य कलाकार बीना मेहता आणि त्यांच्या विद्यार्थ्याीनींनी यंदाच्या नवरात्रोत्सव एक आगळ्यावेगळ्या कलाकृतीचे सादरीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. पारंपरिक गरबा नृत्याला सुफी नृत्याची जोड देऊन त्यांनी 'सुफी गरबा' या थीमचा अविष्कार केला आहे. सुफी गरब्याची तालीम करायलादेखील त्यांनी सुरवात केली आहे. यासाठी पारंपरिक गरबा वेषभूषेपेक्षा वेगळ्या प्रकारची वेषभूषा त्यांनी परिधान केलेली पाहायला मिळाली. घेरदार सुफी पायघोळ लेहंगा आणि स्कार्फचा वापर त्यांनी केला आहे.
राजकोटमध्ये नवरात्राच्या स्वागतासाठी वानंद समाजातर्फे आयेजित कार्यक्रमात चक्क हेल्मेट घालुन गरबा खेळला गेला. हेल्मेटचे महत्त्व अधोरेखीत करण्यासाठी आयोजकांनी ही शक्कल लढवली. वाहनचालकांमध्ये जनजागृती करण्याच्या हेतुने सर्वांनी या उपक्रमाला उस्फुर्त प्रतिसाद दिला.
हेही वाचा - गांधी १५० : गांधी, आझाद अन् गफ्फार खान यांनी पाहिले होते अखंड भारताचे स्वप्न
तर, अहमदाबादमध्ये कर्णावती क्लब तर्फे गरबा प्रेमींसाठी 'एक्वा-गरबा' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पावसाचे सावट असल्याने अनेक ठीकाणी गरबा कार्यक्रमांमध्ये अडथळा येत आहे. मात्र, या गरबा प्रेमी महिलांनी चक्क स्विमिंगपुलमध्येच गरबा खेळण्याचा सराव केला. आगामी काळात गुजरातमध्ये गरब्याचे असेच वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतील यात शंका नाही.