नवी दिल्ली - बिहार विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर बुधवारी सायंकाळी दिल्लीतील भाजप कार्यालयात (भारतीय जनता पार्टी, मुख्यालय) विजयी उत्सव आयोजित करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह भाजपाचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री भाजपा कार्यालयात उपस्थित होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधी पक्षांवर टीका केली. कुटुंब केंद्रीत असलेले अनेक पक्ष लोकशाहीसाठी सर्वात मोठा धोका आहे. मात्र, 'सबका साथ, सबका विश्वास आणि सबका विश्वास', हा भाजपाचा एकमात्र मंत्र आहे, असे ते म्हणाले.
कौटुंबिक पक्ष लोकशाहीसाठी सर्वात मोठा धोका आहे. दुर्दैवाने, कित्येक दशकांपासून, देशाचे नेतृत्व करणारा एक पक्ष कुटुंब केंद्रीत बनला आहे. अशा परिस्थितीत भाजपाची जबाबदारी वाढते. आपल्याला पक्षात लोकशाही कायम ठेऊन एक उत्तम उदाहरण उभे करायचे आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
विकास हेच विजयाचे केंद्र -
भाजपा हा देशातील एकमेव राष्ट्रीय पक्ष आहे, ज्यामध्ये गरीब, दलित, उत्पीडित, शोषित, वंचित लोक त्यांचे प्रतिनिधित्व पाहतात. भाजप समाजातील प्रत्येक घटकाच्या गरजा समजून घेऊन कार्य करीत आहे, असे मोदी म्हणाले. भाजपाप्रती जनतेचे प्रेम वाढत चालले आहे. लोकसभा निवडणुकीत पक्षाने पूर्वीपेक्षा जास्त जागा जिंकून सरकारमध्ये पुनरागमन केले. बिहारमध्ये भाजप हा एकमेव पक्ष आहे , ज्याच्या जागामध्ये वाढ झाली. कालच्या निवडणुकांच्या निकालाने हे स्पष्ट झाले आहे की आता विकास हा विजयाचे केंद्र असेल, असेही मोदी म्हणाले.
बिहारमधील यशाचे श्रेय नड्डा यांना -
कोरोनाच्या संकटकाळात निवडणुका घेणे सोपे नव्हते. परंतु आपली लोकशाही व्यवस्था इतकी मजबूत, पारदर्शक आहे की, या संकटातही एवढी मोठी निवडणूक घेतली. बिहार निवडणुकीतील यशाचे श्रेय पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांना जाते, असेही मोदी म्हणाले.