नवी दिल्ली - 'बुरारी हाऊस'मध्ये गेल्या जुलै महिन्यात एकाच घरातील ११ जणांनी आत्महत्या केल्यामुळे देशाची राजधानी हादरली होती. त्यानंतर दिल्लीतील हे 'बुरारी हाऊस' भूतबंगला म्हणून प्रसिद्ध झाले होते. आता मात्र या घरात एका व्यक्तीने आपले क्लिनिक सुरू केले आहे.
मोहन सिंह कश्यप नावाची व्यक्ती याठिकाणी आपल्या कुटुंबासह राहणार आहे. तसेच येथे आपली पॅथालॉजी लॅबदेखील ते सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले. या घरात राहण्याआधी त्यांनी सर्व विधीवत पूजा पार पाडल्या. आपल्याला भूत-वगैरे अंधश्रद्धांमध्ये विश्वास नाही. त्यामुळे या घरात राहण्यास कोणतीही अडचण नसल्याचे मोहन यांनी स्पष्ट केले.
माझा अशा गोष्टींवर विश्वास नाही, तसे असते तर मी येथे राहायलाच आलो नसतो. माझ्या रुग्णांनादेखील उपचारासाठी येथे येण्यास कोणतीही अडचण नाही. उलट हे घर मुख्य रस्त्याच्या जवळ असल्याने, रुग्णांना येथे येणे सोईचे होणार असल्याचे मोहन यांनी सांगितले.
दरम्यान, कोणतेही नवे काम करण्यापूर्वी आपण गौरी-गणपतीची पूजा करतोच, तो आपल्या संस्कृतीचा भाग आहे. त्यामुळेच या घरात जाण्याआधी आपण पूजा केली. मात्र, अंधश्रद्धांवर कोणीही विश्वास ठेऊ नये, असे मोहन यांनी म्हटले आहे, तर याबाबत विचारले असता स्थानिकांनी, जे झालं ते झालं, आता सर्वकाही ठीक आहे. या घरात जे राहत होते, ते चांगलेच लोक होते. त्यामुळे येथे कोणतीही दुष्टात्मा असण्याची शक्यता नाही, असे ते यावेळी म्हणाले.
हेही वाचा : दिल्लीमध्ये धुक्याचा थर, विमान आणि रेल्वेसेवांवर परिणाम