धार - मध्य प्रदेशातील धारमध्ये एससीएसटी समाजातील युवकाशी प्रेमसंबंध असल्याने आदिवासी तरुणीला तिच्याच नातेवाईकांकडून जबर मारहाण करण्यात आली. तसेच, या मारपिटीचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी तरुणीच्या भावांसह ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. चौघांना ताब्यात घेण्यात आले असून घटनेची चौकशी सुरू आहे.
ही तरुणी संबंधित युवकासह पळून गेली होती. ती हरवल्याची तक्रार पोलिसात नोंदवण्यात आली होती. तिचा पत्ता लागल्यानंतर तिचे नातेवाईक तिला घेण्यासाठी पोलीस ठाण्यात आले. ती त्यांच्यासोबत जाण्यास तयार झाली. तिला सकाळी घरी आणल्यानंतर काही वेळातच तिला जबर मारहाण करण्यात आली. तसेच, मारहाणीचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल करण्यात आला. ही तरुणी सज्ञान आहे. बाग ठाणे परिक्षेत्रातील एका गावात ही घटना घडली. या गावच्या सरपंचांनी याविषयीची तक्रार पोलिसांत नोंदवली आहे. त्यावरून ७ जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून चौघांना ताब्यात घेतले आहे. ३ जण फरार आहेत.
या मारहाणीत तरुणी गंभीर जखमी झाली आहे. तिला रुग्णालयात दाखल केले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.