उद्योगपती राहुल बजाज यांचा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना सवाल
नवी दिल्ली - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना प्रसिद्ध उद्योगपती राहुल बजाज देशातील परिस्थितीवरून प्रश्न केले आहेत. देशात सध्या इतके भीतीचे वातावरण आहे की लोक सरकारवर टीका करायलाही घाबरतात. लोकांना सरकारला प्रश्न विचारण्याचीदेखील मुभा का नाही, असा सवालही त्यांनी शाह यांना केला आहे. एका चर्चात्मक कार्यक्रमात बजाज यांनी आपले ही भुमिका मांडली.विषेश म्हणजे या कार्यक्रमासाठी अमित शाह यांच्यासह अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि रेल्वे मंत्री पीयूष गोयल हेदेखील उपस्थित होते.
हैदराबाद अत्याचार प्रकरणी आरोपींना फाशीची शिक्षा द्या; विद्यार्थ्याचे इमारतीवर चढून शोले स्टाईल आंदोलन
हैदराबाद - महिला डॉक्टरवर झालेल्या सामुहिक अत्यचार आणि हत्या प्रकरणी आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करत तेलांगणामधील एका विद्यार्थ्याने गुन्हेगारांना इमारतीवरून उडी मारून आत्महत्या करण्याची धमकी दिली. पोलिसांच्या प्रयत्नांनंतर विद्यार्थ्याला इमारतीवरून खाली उतरवण्यात आले. त्यानंतर त्याला त्याच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले.
नागरिकत्व सुधारणा विधेयकावर गृहमंत्री शहा यांनी नेते, संघटनांशी साधला संवाद
नवी दिल्ली - गृहमंत्री अमित शहा यांनी नागरिकत्व सुधारणा विधेयकाच्या विविध पैलूंवर राजकीय नेते, विद्यार्थी संघटना, आसाम- मेघालय आणि अरुणाचलमधील नागरी संघटना तसेच ईशान्येकडील राज्यांचे मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा केली. आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल, अरुणाचलचे पेमा खांडू, मेघालयचे कॉनराड संगमा, केंद्रीय गृह राज्यमंत्री किरेन रिजीजू आदी या बैठकीला उपस्थित होते. ३ डिसेंबरला याविषयी पुन्हा चर्चा केली जाईल. ईशान्येकडील राज्यांचा या विधेयकाला विरोध आहे.
'आधार कार्ड गहाण ठेऊन त्याबदल्यात मिळतोय कांदा'
वाराणसी - देशामधील कांद्याचे दर आभाळाला टेकले आहेत. वाराणसीमध्ये आधार कार्ड गहाण ठेऊन त्याबद्दल्यात कांदा कर्ज म्हणून दिला जात आहे. समाजवादी पक्षाच्या एका कार्यकर्त्याचे हे दुकान आहे.
राहुल गांधी 4 ते 8 डिसेंबरला वायनाड दौरा करणार
नवी दिल्ली - काँग्रेसचे नेते राहुल गांधी 4 ते 8 डिसेंबर केरळमधील वायनाड दौऱ्यावर जाणार आहेत. यापुर्वी राहुल 27 ऑगस्टला वायनाड दौऱ्यावर गेले होते. यावेळी त्यांनी वायनाडमधील पूरग्रस्तांची भेट घेतली होती. राहुल गांधी वायनाड मतदारसंघाचे खासदार आहेत. 2019 लोकसभा निवडणुकांमध्ये त्यांनी वायनाड मतदारसंघातून विजय प्राप्त केला होता.
'अधीर रंजन चौधरी यांच्या डोक्यात फरक पडलाय'
नवी दिल्ली - काँग्रेसचा वरिष्ठ नेता अधीर रंजन चौधरी यांनी मोदी-शाह यांना घुसखोर म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यावरून 'अधीर रंजन चौधरी यांच्या डोक्यात फरक पडला आहे', असा पलटवार हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी केला आहे.
पीडितेप्रमाणेच माझ्या मुलालाही जिवंत जाळा, आरोपीच्या आईची मागणी
हैदराबाद - हैदराबादमधील डॉक्टर तरुणीवर बलात्कार करुन तिची हत्या करणाऱया आरोपीच्या आईने कठोर भूमिका घेतली आहे. ज्या निर्घृण पद्धतीनं पीडितेला जिवंत जाळलं त्याच प्रकारे माझ्या मुलाला जिवंत जाळा, अशी मागणी चार आरोपीपैकी एक आरोपी सी केशावुलूच्या आईने केली आहे.
लग्न झाल्यानंतर 48 तासांच्या आत नववधूचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
श्रीकाकुलम - जिल्ह्यातील पलासा मतदारसंघात गरुड कांडी येथे एका नवविवाहित वधूचे लग्न झाल्यानंतर 48 तासांच्या आत हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. 28 नोव्हेंबरला तीचा मृत्यू झाला होता. दमयंती असे मरण पावलेल्या नववधूचे नाव आहे. तीच्या अचानक निधनाने कुटुंबीयावर शोककळा पसरली आहे
एकाचवेळी महिलेने दिला 4 मुलांना जन्म
उत्तर कानडा - कर्नाटक राज्यातील सिरसी येथे एका खासगी रुग्णालयात महिलेने चार जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. चारपैकी एका मुलाचा जन्म झाल्यावर मृत्यू झाला. उर्वरित तीन नवजात मुलांची काळजी घेतली जात आहे.
अज्ञात नराधमाने एका 8 वर्षाच्या मुलीचे अपहरण करून केला बलात्कार
राजकोट - अज्ञात व्यक्तीने एका आठ वर्षांच्या मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी आरोपींविषयी माहिती देणाऱ्यास 50 हजार रुपये बक्षीस जाहीर केले आहे.
हैदराबादमध्ये एकाच रात्रीत ५८६ तळीरामांवर कारवाई..
तेलंगणा - दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी हैदराबाद वाहतूक पोलिसांनी विशेष तपासणी केली. यामध्ये २९ नोव्हेंबरच्या रात्री तब्बल ५८६ तळीरामांवर कारवाई करण्यात आली.
अतिरिक्त पोलीस आयुक्त अनिल कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, यासाठी वाहतूक पोलिसांची ५० पथके तैनात करण्यात आली होती. साधारणपणे सहा हजार वाहनचालकांची यावेळी तपासणी करण्यात आली.
दारूच्या बाटल्यांसोबत बनवला व्हिडिओ, तरुणाला अटक..
बिहार - दारूबंदीच्या निषेधार्थ व्हिडिओ बनवून तो सोशल मीडियावर शेअर करणाऱ्या तरुणाला बिहार पोलिसांनी अटक केली आहे. बिहार सरकारने राज्याला 'ड्राय स्टेट' घोषित करत, दारूबंदी केली आहे. त्याचाच निषेध व्यक्त करण्यासाठी एका बिहारी तरुणाने, दारूच्या बाटल्यांसोबत आपला व्हिडिओ शेअर केला होता. यामध्ये तो पोलिसांना आणि प्रशासनाला आपल्याला अटक करण्याचे आव्हान देताना दिसून येत होता. यामध्ये त्याच्यासोबत त्याचे दोन मित्रही दिसून येत आहेत, त्यांचा शोध सुरु आहे.
स्वतःच्याच घरात बेशुद्धावस्थेत आढळली तरुणी; अत्याचार झाल्याचा संशय..
तेलंगणा - हैदराबादच्या मडचल जिल्ह्यातील बचुपल्लीमध्ये, एक युवती स्वतःच्या घरात बेशुद्धावस्थेत आढळली होती. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखत तातडीने तिला रुग्णालयात दाखल केले. व्यवसायाने सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेली ही तरुणी सध्या काहीही सांगण्याच्या स्थितीत नसल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले.
दरम्यान, तिचा एक मित्र सकाळी तिला भेटण्यासाठी आला होता, अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यामुळे, तिच्यावर जबरदस्ती झाल्याचा संशय पोलीस व्यक्त करत आहेत. त्यादृष्टीने तपास सुरू आहे.
चंदीगढमध्ये पहायला मिळणार 'बोफोर्स तोफ'..
हरियाणा - देशातील प्रत्येक नागरिकाने बोफोर्स तोफेचे नाव ऐकले असणार हे नक्की. मात्र, असे लोक अगदी कमी आहेत ज्यांनी प्रत्यक्षात या तोफेला पाहिले आहे. चंदिगढमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या मिलिट्री लिटरेचर फेस्टिवलमध्ये नागरिकांना ही तोफ पहायला मिळणार आहे.
एका लष्करी अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ही तोफ स्वीडनहून मागवण्यात आली आहे. कारगीलचे युद्ध जिंकण्यात बोफोर्स तोफेचे मोठे योगदान राहिले आहे. या तोफेला चालवण्यासाठी आठ जवानांची गरज असते. ही तोफ ४२ किलोमीटरपर्यंतचे लक्ष्य भेदू शकते.
हिमाचल प्रदेशमध्ये आतापर्यंतच्या सर्वात कमी तापमानाची नोंद..
हिमाचल प्रदेश - लाहौल स्पीती जिल्ह्याच्या काजा उपविभागामध्ये शनिवारी आजवरच्या सर्वात कमी तापमानाची नोंद करण्यात आली. यावेळी किमान तापमान हे उणे १८ अंश सेल्सिअस एवढे, तर कमाल तापमान हे तीन अंश सेल्सिअस एवढे होते. या पार्श्वभूमीवर, नागरिकांना खाद्यपदार्थ, लाकूड आणि रॉकेलचा पुरेसा साठा उपलब्ध करून देण्यात आला असल्याची माहिती, लाहौल जिल्ह्याचे अतिरिक्त जिल्हा न्यायदंडाधिकारी ज्ञान सागर यांनी दिली.
गढवा जिल्ह्यात भीषण अपघात, भाजप नेत्याच्या भाच्यासह चार ठार..
झारखंड - राष्ट्रीय महामार्ग ७५ वर झालेल्या एका भीषण अपघाता चार लोकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मृतांमध्ये भाजपचे भवनपुरमधील आमदार भानू प्रताप शाही यांचे भाचे प्रशांत सिंह याचाही समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रशांत सिंह हे शनिवारी आपल्या सहकाऱ्यांसह भवनपुरकडे निघाले होते. यावेळी महामार्गावर त्यांच्या गाडीचा अपघात झाला. यामध्ये प्रशांत सिंह, उमा सिंह आणि विक्की (चालक) यांचा जागीच मृत्यू झाला, तर दोन लोक गंभीर जखमी झाले. त्यानंतर, गढवा जिल्ह्यातील रहिवासी असणाऱ्या आणखी एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
भारत लवकरच पाकव्याप्त काश्मीरही ताब्यात घेईल..
हरियाणा - जर सर्वकाही ठीक राहिले, तर भारत लवकरच पाकव्याप्त काश्मीरही ताब्यात घेईल, असे वक्तव्य हरियाणाचे गृहमंत्री अनिल विज यांनी काल केले. ते अंबाला जिल्ह्यात बोलत होते. जम्मू काश्मीरच्या राजांनी आपल्यासोबत करार केला होता, त्यामुळे पाकिस्तानचा त्यावर काहीही हक्क नाही. मात्र, याआधीच्या घाबरट सरकारांनी या गोष्टीवर कधीच लक्ष दिले नाही, असे म्हणत त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. यासोबतच, सरकार सध्या समान नागरी संहितेवर काम करत असल्याचेही त्यांनी सांगितले.
गुन्हे शाखेचे अधिकारी असल्याचे सांगत व्यावसायिकाला लुटले..
नवी दिल्ली - गाझियाबाद शहरामध्ये एका कापड व्यावसायिकाला लुटल्याची घटना घडली आहे. व्यावसायिकाने दिलेल्या माहितीनुसार, चोरांच्या एका टोळीने आपण गुन्हे शाखेचे अधिकारी असल्याचे सांगत, स्कूटर तपासण्याचे कारण पुढे करत त्यांना अडवले होते. त्यानंतर त्यांना लुटून हे चोरटे फरार झाले.
बिजेंद्र जैन असे या व्यावसायिकाचे नाव आहे. ही चोरट्यांची टोळी त्यांच्याकडील सोन्याची अंगठी आणि ब्रेसलेट घेऊन पसार झाली. जैन यांनी याबाबत तक्रार नोंदवली आहे. तसेच, त्यांच्याकडून माहिती घेऊन चोरट्यांचे रेखाचित्र बनवण्याचे काम सुरू आहे. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणीही केली जात आहे.
मध्य प्रदेशमधील आरोग्य व्यवस्था 'सलाईनवर'; मोबाईल टॉर्चच्या प्रकाशात केल्या शस्त्रक्रिया..
भोपाळ - मध्य प्रदेशचा आरोग्य विभाग लोकांच्या आरोग्याच्या बाबतीत आजिबात गंभीर नसल्याचे दिसून येत आहे. सतना जिल्ह्याच्या बिरसिंहपूर भागामध्ये ३५ महिलांची नसबंदी शस्त्रक्रिया चक्क मोबाईल टॉर्चच्या प्रकाशात झाल्याची घटना समोर आली आहे. तसेच, विदिशा जिल्ह्यात झालेल्या प्रकाराप्रमाणे याहीठिकाणी शस्त्रक्रिया करण्यासाठी आलेल्या महिलांना जमिनीवर झोपवण्यात आल्याचा प्रकार पहायला मिळाला.
जिल्हा रुग्णालयाचा ढिसाळ कारभार, शस्त्रक्रियेनंतर रुग्णांना झोपवले जमिनीवर..
भोपाळ (मध्य प्रदेश) - विदिशा जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयाचा ढिसाळ कारभार उघडकीस आला आहे. छत्तरपूर गावातील महिलांच्या नसबंदी शस्त्रक्रियेनंतर, रुग्णालय प्रशासनाने जवळपास ३० पेक्षा जास्त महिलांना जमिनीवरच झोपण्यास सांगितले. त्यामुळे रुग्णालयामध्ये पुरेशा सुविधा नसल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांनी केला. एका रुग्णाच्या नातेवाईकाने दिलेल्या माहितीनुसार, रुग्णालयामध्ये स्ट्रेचरदेखील उपलब्ध नसल्यामुळे रुग्णालयाचे २-३ कर्मचारी रुग्णांना हातानेच उचलून जमिनीवर झोपवत होते.
दरम्यान, रुग्णालयाच्या बाजूने बोलताना जिल्हा शल्य चिकित्सक आर. त्रिपाठी म्हणाले, की एका दिवसात साधारणपणे ३० पेक्षा जास्त रुग्णांच्या शस्त्रक्रिया होतात. नसबंदी शस्त्रक्रियेनंतर रुग्णांना जास्त वेळ रुग्णालयात राहण्याची गरज नसते. त्यामुळे ही तात्पुरती व्यवस्था करण्यात आली आहे.
कर्नाटकच्या महिलेवर उत्तराखंडमध्ये अत्याचार..
उत्तराखंड - कर्नाटकमधील एका महिलेवर उत्तराखंडमध्ये अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. घरच्यांशी झालेल्या वादामुळे कर्नाटकची ही २८ वर्षीय महिला घरातून पळून गेली होती. उत्तराखंडच्या तेहरी जिल्ह्यामध्ये एका ट्रकड्रायव्हरने तिच्यावर अत्याचार केले. त्यानंतर त्याने तिला अज्ञात स्थळी सोडून दिले. महिलेने तक्रार दाखल केल्यानंतर, तिने दिलेल्या माहितीवरून ट्रकचालकाचा शोध पोलीस घेत आहेत.
हैदराबाद महिला डॉक्टर अत्याचार प्रकरण - युवा काँग्रेसचा दिल्लीमध्ये 'कँडल मार्च'..
नवी दिल्ली - देशभरातील महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या निषेधार्थ भारतीय युवा काँग्रेसतर्फे, दिल्लीतील जंतर मंतरवर कँडल मार्चचे आयोजन केले गेले होते. शनिवारी संध्याकाळी, हातात मेणबत्त्या आणि निषेधाचे फलक घेऊन शांततेत हा मोर्चा पार पडला. हैदराबादमधील महिला डॉक्टरवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेने देशभरात संतापाची लाट पसरली आहे. देशभरात या घटनेचा निषेध नोंदवत, महिला सुरक्षेसाठी सरकारने कठोर पावले उचलावीत अशी मागणी केली जात आहे.
हैदराबाद महिला डॉक्टर अत्याचार प्रकरण - चिलकूर मंदिरातील प्रार्थना २० मिनिटांसाठी स्थगित
तेलंगणा - महिला पशुवैद्यकीय डॉक्टरच्या अत्याचार आणि हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ, चिलकूर बालाजी मंदिरातील प्रार्थना या २० मिनिटांसाठी स्थगित करण्यात आल्या होत्या. यादरम्यान, सर्व भाविक-भक्त मंदिराच्या गाभाऱ्याबाहेर थांबले होते, तर आतमध्ये पुजाऱ्यांनी महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष 'महा प्रदक्षिणम' आरती सादर केली.
हैदराबादमधील महिला पशुवैद्यकीय डॉक्टरच्या अत्याचार आणि हत्या प्रकरणामुळे देशातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या घटनेच्या निषेधार्थ सोशल मीडियावर तसेच देशभरातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे.
हनीट्रॅपिंग प्रकरण - साँझा लोकस्वामी वर्तमानपत्राचे कार्यालय सील!
मध्य प्रदेश - हनीट्रॅप प्रकरणाशी संबंध असल्यामुळे इंदोरमधील साँझा लोकस्वामी या वर्तमानपत्राचे कार्यालय पोलिसांकडून सील करण्यात आले. या प्रकरणाच्या तपासाचा भाग म्हणून पोलिसांनी शनिवारी इंदोरमधील विविध ठिकाणांवर छापे मारले. यामध्ये या वर्तमानपत्राचे मालक जितेंद्र सोनी यांच्या घराचाही समावेश होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनी यांच्याकडे या प्रकरणाशी संबंधित नेत्यांचे आणि महिलांचे व्हिडिओ होते.
काश्मीरमधील दहशतवादाचे प्रमाण गेल्या सहा महिन्यांमध्ये झाले कमी - प्रकाश जावडेकर
नवी दिल्ली - कलम ३७० काढल्यापासून, काश्मीरमधील दहशतवाद अगदी कमी झाला आहे, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केले. मोदी सरकारचे दुसरे पर्व हे देशाची सुरक्षा आणि विकासाला समर्पित आहे, असेही ते म्हणाले. यासोबतच, जागतिक मंदीचा भारतावरही थोडा परिणाम झाला आहे, मात्र त्यातून सावरण्याचे प्रयत्न सरकारने सुरू केल्याचे त्यांनी सांगितले.
काश्मीरबाबत बोलताना जावडेकर म्हणाले, की गेल्या सहा महिन्यांमध्ये काश्मीरमधील दहशतवाद कमी झाल्यामुळे, नागरिकांचे दैनंदिन जीवन अधिक सुरळीतपणे सुरू आहे. देशाच्या सुरक्षेसाठी सरकार विविध निर्णय घेत आहे. त्याच पार्श्वभूमीवर राफेल विमाने आणली जात आहेत.
इसिस प्रकरण - राष्ट्रीय अन्वेषण एजन्सीचे तामिळनाडूमध्ये छापे..
तामिळनाडू - केरळमधील एर्नाकुलमच्या विशेष एनआयए न्यायालयाने दिेलेल्या आदेशानुसार, राष्ट्रीय अन्वेषण एजन्सीने (एनआयए) तमिळनाडूमध्ये विशेष छापे मारले. तंजावूर आणि तिरूचिरापल्ली या जिल्ह्यांमध्ये हे छापे मारण्यात आले.
यावर्षी जूनमध्ये केरळच्या कोईंबतूरमधून दोन संशयित दहशतवाद्यांना अटक करण्यात आली होती. हे आरोपी इसिस या दहशतवादी संघटनेच्या विचारसरणीशी संबंधित गोष्टी सोशल मीडियावर पसरवत होते. त्या माध्यमातून केरळ आणि तमिळनाडूमध्ये दहशतवादी हल्ले करण्याची योजना असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
शनिवारी मारलेल्या छाप्यांमध्ये या दहशतवाद्यांच्या साथिदारांकडून दोन लॅपटॉप, सहा मोबाईल, एक पेनड्राईव्ह, एक हार्ड डिस्क, एक मेमरी कार्ड, एक कुऱ्हाड आमि १७ कागदपत्रे जप्त करण्यात आली.
कागदपत्रे नसल्यामुळे कारचालकाला ९.८० लाखांचा दंड..
गुजरात - अहमदाबाद पोलिसांनी एका कारचालकाला कागदपत्रे आणि नंबरप्लेट नसल्यामुळे तब्बल ९.८० लाखांचा दंड ठोठावला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाहतूक पोलिसांनी पोर्श कंपनीची एक गाडी अडवली होती. गाडीला नंबरप्लेट नव्हती, तसेच गाडीची कागदपत्रेही चालकाकडे नव्हती. त्यानंतर पोलिसांनी आरटीओला संपर्क केल्यानंतर त्यांना समजले की गाडीचा विमा काढण्यात आला नाही, तसेच कारचालकाने पथकर आणि याआधीच्या दंडाची रक्कमदेखील भरलेली नाही. या सर्व माहितीवरून चालकाला ९.८० लाखांचा दंड ठोठावण्यात आला.